‘द फॅमिली मॅन २’मध्ये अभिनेता दर्शन कुमारनं मेजर समीर ही व्यक्तीरेखा साकारली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दर्शननं त्याच्या या भूमिकेनंतर त्याला आलेले अनुभव शेअर केले. आपल्या या भूमिकेला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं दर्शन सांगतो. दर्शन म्हणाला, ‘बॉलिवूडमध्ये माझ्या कामाचं कौतुक झालं. चाहत्यांचंही भरभरून प्रेम मिळालं. पण ‘द फॅमिली मॅन २’नंतर एक वेळ अशी आली की मला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. एवढंच नाही तर लोक मला पाकिस्तानी समजू लागले आहेत.’
पुढे म्हणाला, ‘या वेब सीरिजच्या रिलीज नंतर मला अनेकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. चाहत्यांनी कौतुक केलं. अभिनय चांगला झाल्याचं म्हटलं. माझा अभिनय, लुक आणि अॅटीट्यूड या सर्वच गोष्टींसाठी कौतुक केलं गेलं. पण काही लोक असेही आहेत ज्यांनी माझ्या नावानं, ‘हिंदुस्तान जिंदाबाद, मेजर समीर मुर्दाबाद’, ‘दूध मांगोगे तो खीर देंगे, मेजर समीर हिंदूस्तान की तरफ देखा तो चीर देंगे’ अशा प्रकारच्या घोषणा देत होते.’
दर्शन सांगतो, ‘या भूमिकेनंतर अनेक लोकांनी माझा तिरस्कार केला. लोकांना असं वाटतंय की मी पाकिस्तानी आहे. ते विसरून गेलेत की मी दर्शन आहे आणि एक अभिनेता आहे जो आपली भूमिका उत्तम निभावण्याचा प्रयत्न करत आहे.’ दर्शनच्या व्यतिरिक्त या वेब सीरीजमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा अक्कीनेनीही खलनायकी भूमिकेत दिसली होती. वेब सीरिजच्या रिलीजनंतर तिलाही सोशल मीडियावर बऱ्याच ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे.