नवी दिल्ली: जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांना कधी-कधी जीवही धोक्यात घालावा लागतो. अशीच एक घटना दिल्लीत घडली आहे. कारवाईसाठी गेलेल्या पोलीस कॉन्स्टेबलनं अंगावर धावून येणाऱ्या जमावाच्या तावडीतून जीव वाचवण्यासाठी हवेत गोळीबार करून तेथून पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दिल्लीतील मदनपूर परिसरात ही घटना घडली. अवैध दारूविक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल रामकिशन शुक्रवारी मध्यरात्री जे. जे. कॉलनीतील बी ब्लॉक येथे पोहोचले. अवैध दारुची विक्री करणाऱ्या अशोक नावाच्या व्यक्तीच्या घरी गेले. तेथे अशोकच्या पत्नीनं कारवाईला विरोध करत त्यांच्याशी वाद घातला. काही वेळानंतर शेजारीही तेथे आले. त्यांनी रामकिशन यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यांच्या मोटरसायकलचेही नुकसान केले. जमावाला पांगवण्यासाठी त्यांनी हवेत गोळीबार केला. मात्र, तरीही जमाव त्यांच्या अंगावर धावून गेला. अखेर जीव वाचवण्यासाठी ते मोटरसायकल तेथेच सोडून धावू लागले.
रामकिशन यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. जमावानं रामकिशन यांच्या मोटरसायकलची तोडफोड केली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.





























WhatsApp