जुहूतील सहा आजींबाईंना क्रुझवारीपूर्वी गाठावे लागले पोलीस ठाणे

- Advertisement -

मुंबई : मैत्रिणीचे क्रुझवारीचे किस्से ऐकून जुहूतील ६ आजींनी क्रुझ सफर करण्याचे ठरवले. ट्रॅव्हलकंपनीसोबत चर्चा केली. ऑनलाइन पैसेही भरले. मात्र, क्रुझवर जाण्यापूर्वी आजींना पोलीस ठाणे गाठावे लागले.

जुहू तारा रोड परिसरात राहणाऱ्या संतोष श्याम मेहरा (७१) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मेहरा या व्यावसायिक आहेत. मैत्रिणीचे क्रुझवारीचे किस्से ऐकून मेहरा यांनी मैत्रिणींसह क्रुझ सफरीचा बेत आखला. सर्व ६५ ते ७५ वयाच्या आहेत. मैत्रिणीकडूनच ट्युबा ट्रॅव्हल्स कंपनीची एजंट महिला ट्युबा फातमा (२५) हिच्या संपर्कात त्या आल्या. फातमाने जूनमध्ये मेहरा यांच्या घरी येऊन क्रुझ सहलीच्या पॅकेजबाबत माहिती दिली. प्रत्येकीला ६० ते ७० हजार भरण्यास सांगितले. त्यानुसार ६ आजींनी ऑनलाइन पैसे जमा केले. खरेदीही झाली. मात्र, तारीखच ठरत नव्हती. फातमाने तिकिटे पाठवली, पण तारीख जवळ येताच ती सबबी सांगून सहल पुढे ढकलत असे. त्यामुळे मेहरा यांनी पैसे परत करण्यास सांगितले. पैसे परत न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांनी दुजोरा दिला असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले.

- Advertisement -