Home अश्रेणीबद्ध ज्ञानियांचा राजा सासवड मुक्कामी, हरिनामाच्या गजरात भक्तिचा फुलला मळा

ज्ञानियांचा राजा सासवड मुक्कामी, हरिनामाच्या गजरात भक्तिचा फुलला मळा

सासवड: अवघा रंग एक झाला! रंगी रंगला श्रीरंग!..संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव महाराज पालखी सासवड येथे मुक्कामी आहे. श्रींच्या दर्शनासाठी पुरंदर तालुक्यातील पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने भक्त आले होते. अभंग आणि हरिनामाच्या गजराने सासवड परिसर गजबजून गेला होता. सोहळा प्रमुख योगेश देसाई यांच्या हस्ते पहाटे पूजा करण्यात आली. पालखीच्या दर्शनासाठी वारकरी आणि परिसरातील भक्तांची सकाळपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. रांगेत उभे असलेले भक्त दिवसभर येत असलेल्या पावसाच्या हलक्या सरीत ओलेचिंब झाले होते. 
  सासवड नगरीत वैष्णवांचा मेळावा भरला होता. एकादशीमुळे ठिकठिकाणी दुपारी खिचडी, भगर असे उपवासाचे पदार्थ करण्यात आले होते.पावसाळामुळे अनेक ठिकाणची कीर्तने रद्द करण्यात आली. असे असले तरी राहुट्यामध्ये टाळ मृदुगांच्या गजरात भजन सुरू होते. त्यामुळे वातावरण प्रसन्न होत होते. दर्शनाची रांग मुख्य रस्त्यापर्यत वाढत होती. त्यामुळे सतत वाहतूक कोंडी होत होती. शिवाजी चौकात सासवड नगर परिषदने नियंत्रण कक्ष द्वरे वारकऱ्यांना मदत करत होते. तसेच वाहतूक चालकांना सूचना देत होते.   अंतर्गत रस्ते आणि पालखी स्थळावर जाणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या वेगळया प्रकारच्या दुकानांमध्ये वारकरी आणि भक्तांची खरेदीची लगबग सुरू होती. रात्री ९ सुमारास कीर्तन झाले. क्रीएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचकडून आळंदी देवस्थाननी दिलेले पास दाखवून पत्रावळ्या वाटण्यात येत होत्या.मोफत वैद्यकीय सेवा, दन्त तपासणी, पाणी वाटप करण्यात येत होते. सासवड बस स्थानकात वारकरी आराम करत होते.   
   ..
 गुजरातला झालेल्या वायू वादळामुळे रेनकोट उत्पादन होण्यास उशीर झाला होता.सासवड येथील सुवर्ण नगरी येथे रेनकोट वाटप करण्यात आले,  अशी माहिती मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारती यांनी पत्रकारांना माहीती दिली. 
….
तेरा ठिकाणी ९०० स्वछता गृहांची सोय करण्यात आली होती. एकूण एकोणतीस पाणी टँकरची सोय करण्यात आली होती. ३५ टँकर वारीसोबत आहेत. अशी माहिती तहसीलदार अतुल म्हेत्रे यांनी दिली. इतर व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. 
    …..
 एकादशीला माऊलींची पालखी सासवडला येते. परंतु तिथीचा क्षय झाल्यामुळे पालखी एक दिवस अगोदर दशमीला पालखी सासवडला आली.  दरवर्षी बारस सासवडला एकादशीलाच उपवास सोडला जात असे.  मात्र, यावर्षी बारस (उपवास) जेजुरीला सोडली जाणार आहे. तसेच सोपान देवांची पालखी ही एकादशीला प्रस्थान करत असे. मात्र यंदा तसे न होता, आज म्हणजे बारसीला माऊलीची पालखी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी तर सोपानदेवांची पालखी सकाळी अकरा वाजता जेजुरीला प्रस्थान ठेवणार आहे.