Home शहरे अकोला ज्ञान, विज्ञान  आणि तंत्रशिक्षणात मातृभाषा आणि राष्ट्रभाषेचा उपयोग करण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

ज्ञान, विज्ञान  आणि तंत्रशिक्षणात मातृभाषा आणि राष्ट्रभाषेचा उपयोग करण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

0
ज्ञान, विज्ञान  आणि तंत्रशिक्षणात मातृभाषा आणि राष्ट्रभाषेचा उपयोग करण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 14:  मराठी ही आपली मातृभाषा आहे तर हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. ज्ञान, विज्ञान  आणि तंत्रशिक्षणात अधिकाधिक मातृभाषा आणि राष्ट्रभाषेचा उपयोग दैनंदिन वापरात करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

आज सह्याद्री अतिथीगृह येथे हिंदी दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी हिंदी साहित्यिक डॉ. शीतलाप्रसाद दुबे आणि आनंद सिंह यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे  सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, आपल्या प्रत्येकाच्या ह्दयात जशी पटकन आपली मातृभाषा पोहोचते तशीच राष्ट्रभाषाही आपल्या मनापर्यंत पटकन पोहोचते. आज देशाबरोबरच विश्वातही मोठया प्रमाणावर हिंदी भाषा बोलली जाते त्यामुळे मातृभाषेबरोबरच राष्ट्रभाषेचा प्रचार आणि प्रसार वाढविण्यासाठी काम येत्या काळात करण्यात येईल.

राज्य शासनामार्फत महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत या भाषेतील साहित्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्यात येईल. हिंदी, सिंधी आणि गुजराती या तीन स्वतंत्र अकादमी असून या तीन अकादमींसाठी तीन स्वतंत्र समित्यांचे गठन लवकरच करण्यात येईल असेही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमात बोलताना साहित्यिक डॉ. दुबे म्हणाले की, जेव्हा आपण देशभरासह परदेशात जातो आणि  तेथील भाषा बोलण्यास अडचण निर्माण होते तेव्हा आपण पटकन हिंदी भाषेतून संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रात तर मराठी आणि हिंदी या बहिणींसारख्या असून या दोन्ही भाषांचा प्रवास येणाऱ्या काळात एकत्रितपणे होईल अशी आशा वाटते. येणाऱ्या काळात साहित्य अकादमीमार्फत विविध भाषा संवर्धनासाठी चांगले काम होईल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.