ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन, ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन, ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- Advertisement -


मुंबई- हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज ७ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. यासाठी त्यांना हिंदुजा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार यांच्यासोबत सावली सारख्या राहणाऱ्या पत्नी सायरा बानो यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्या अनेकदा चाहत्यांनाही दिलीप कुमार यांच्यासाठी सतत प्रार्थना करण्याचे आवाहन करायच्या.

दिलीप कुमार यांचे डॉक्टर जलील पारकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आज मुंबईतील सांताक्रूझ स्मशानभूमीत दिलीप कुमार यांच्यांवर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसुफ खान होते आणि त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी अविभाजित भारतातील पेशावर येथे झाला होता. एका निर्मात्याच्या सांगण्यावरून त्यांनी आपलं नाव बदललं होतं. यानंतर संपूर्ण जग त्यांना दिलीप कुमार या नावाने ओळखू लागले. १९४४ मध्ये ‘ज्वार भाटा’ चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर दिलीप कुमार यांनी मागे वळून पाहिले नाही. एकामागोमाग एक सुपरहिट सिनेमे देत त्यांनी हिंदी सिनेसृष्टीवर राज्य केलं.

दिलीप कुमार यांचं सुरुवातीचं शिक्षण नाशिकमध्ये झाले. नंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचे काही सिनेमे फारसे चालले नाहीत त्यानंतर अभिनेत्री नूरजहांसोबत त्यांची जोडी हिट ठरली. ‘जुगनू’ हा दिलीप कुमार यांचा पहिला हिट सिनेमा होता. यानंतर दिलीप कुमार यांनी एकामागोमाग एक अनेक हिट सिनेमे दिले. त्यांचा मुगल-ए-आजम हा सिनेमा त्या काळात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला होता. ऑगस्ट १९६० मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा त्याकाळी बनलेला सर्वात महागडा सिनेमा होता.

दिलीप कुमार यांना आठ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार सर्वाधिक पुरस्कार जिंकण्यासाठी दिलीप कुमार यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. दिलीप कुमार यांना १९९१ मध्ये पद्मभूषण आणि २०१५ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. १९९४ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००० ते २०००६ या काळात ते राज्यसभेचे सदस्यही होते. १९९८ मध्ये त्यांना पाकिस्तानचा सर्वोत्कृष्ट नागरिक सन्मान निशान-ए-इम्तियाज हा पुरस्कारही देण्यात आला होता.

दिलीप कुमार यांची ‘ट्रॅजेडी किंग’ अशी विशेष ओळख होती. आपल्या कारकीर्दीत त्यांनी ‘शहीद’, ‘मेला’, ‘अंदाज’, ‘जोगन’, ‘बाबुल’, ‘डाग’, ‘आन’, ‘देवदास’, ‘आझाद’, ‘नया दौर’, ‘मधुमती’, ‘पैगाम’, ‘कोहिनूर’, ‘मुगल-ए-आजम’, ‘गंगा जमुना’, ‘राम और श्याम’, ‘आदमी’, ‘गोपी’, ‘क्रांती’, ‘शक्ती’, ‘विधाता’, ‘कर्मा’ आणि ‘सौदागर’ सारखे अनेक हिट सिनेमे दिले आहेत.



Source link

- Advertisement -