हायलाइट्स:
- डॉ. तात्याराव लहाने शासकीय सेवेतून निवृत्त
- आरोग्यसेवेमुळे राज्यभरात ओळख
- निवृत्तीची माहिती देताना लिहिलं भावुक पत्र
‘मी संचालक या पदावरुन आज निवृत्त होत आहे, परंतु पुढील काळात माझे अंधत्व नियंत्रणाचे व नेत्र रुग्णांच्या शस्त्रक्रियेचे काम हे नेहमीसाठी सुरू राहील,’ अशी माहिती तात्याराव लहाने यांनी दिली आहे. तसंच या ३६ वर्षाच्या कालावधीमध्ये हजारो मित्र मिळाले, अनेक लोकांची मदत झाली त्यासर्वांचा नामाउल्लेख करणे शक्य नाही पण त्या सर्वांचा ऋणी आहे. त्या सर्वांचे प्रेम मिळणारा मी एक अतिशय नशिबवान डॉक्टर स्वत:ला समजतो. हे आपले प्रेम कायम ठेवावे अशी आपल्याकडे प्रार्थना करतो, असे भावनिक उद्गारही यावेळी डॉ. लहाने यांनी काढले आहेत.
किडनीचा आजार आणि नवा जन्म
डॉ. तात्याराव लहाने यांनी आपल्या निवृत्तीची माहिती देताना एक पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख केला आहे. ‘१७ मे १९८५ रोजी मी अधिव्याखाता म्हणून अंबाजोगाई जि. बीड येथे सेवेत रूजू झालो होतो. अंबाजोगाई येथे असतानाच अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत मी नेत्रशिबिरांना सुरुवात केली होती. बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागांत जाऊन अंधत्व आलेल्यांना दृष्टी देण्याचे काम आठ वर्ष केले. त्यानंतर धुळे येथील नवीनच स्थापीत झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आक्टोबर १९९३ ते जुलै १९९४ असे नऊ महिने काम केले. तेथेही आदिवासी व दुर्गम भागांत जाऊन नेत्रशस्त्रक्रिया केल्या. पण किडनीच्या आजार बळावल्याने मी मुंबई येथे सर जेजे रुग्णालयात जुलै १९९४ ला रूजू झालो. दर गुरूवारी माझे डायलिसीस सुरू झाले. मी येथे आल्यानंतर नवनवीन तंत्रज्ञान शिकून घेण्यास सुरुवात केली. पुढे माझा किडनीचा आजार बळावला. किडनी बदलावी लागणार होती. माझी आई (माय) अंजनाबाईने स्वत:ची किडनी देऊन फेब्रुवारी १९९५ ला मला दुसरा जन्म दिला. मायीच्या या दातृत्वाने प्रेरीत होऊन मी सामाजासाठी काम करण्याचा निर्णय घेतला,’ असं या पत्रात लहाने यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोव्हिड काळात राज्य सरकारने स्थापन केलेल्या कोव्हिड टास्क फोर्सचे डॉ. तात्याराव लहाने हे सदस्य होते. या काळात त्यांनी केलेली कामगिरीही चर्चेत राहिली.