मुंबईतील झवेरी बाजार हा सन १९२५पासून कार्यरत आहे. संपूर्ण देशाला पुरवठा होणाऱ्या सोने-चांदीची ६० ते ६५ टक्के उलाढाल याच बाजारातून होते. परंतु हा बाजार व बाजार असलेला भाग प्रचंड दाटीवाटीचा आहे. करोना संकटात सुरक्षित वावरचे येथे पालन होणे शक्य नाही. त्यामुळेच हा बाजार खारघर येथे मोकळ्या ठिकाणी हलवला जाईल, असा निर्णय इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) घेतला आहे. पण स्थानिक व्यापारी व या बाजाराचे पदाधिकारी त्याबाबत फारसे उत्साही नाहीत. या संघटनेच्या मुंबई क्षेत्राचे अध्यक्ष व मुंबई ज्वेलरी असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमारपाल जैन यांनी याबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले की, ‘आयबीजेए संघटनेने बाजार हलविण्याचे नियोजन केले असेल. पण वास्तवाचा विचार केल्यास तसे करणे शक्य नाही. एक तर हा बाजार मुंबईची जुनी ओळख आहे. ती ओळख पुसता येणार नाही. दुसरे असे की या बाजारात ४ लाख कारागीर काम करतात. केवळ कारागिरांना येथून हलवले तरी रोज खारघरहून येथे दागिने घेऊन येणे सुरक्षेच्या दृष्टीने जोखमीचे आहे. त्यामुळे हे केवळ कागदावर शक्य आहे. प्रत्यक्षात तसे होणे कठीण आहे. याचा आयबीजेए संघटना देखील विचार करेल, असा विश्वास आहे.’
खारघर येथील एमआयडीसी क्षेत्रात त्यांनी ६० ते ७० एकराचे दोन भूखंड निश्चित केले आहेत. या भूखंडावर मोठा ज्वेलरी हब उभा केला जाईल. अत्याधुनिक दागिना कारखाने, बँका तेथे असतील. कारागिरांसाठी स्वतंत्र सोय असेल. जवळपास १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तेथे होईल. तसेच याबाबत लवकरच संघटनेकडून राज्य सरकारशी चर्चा होणार असल्याचे आयबीजेएने म्हटले आहे.
बाजार हलवण्यास कारण की…
झवेरी बाजाराचा भाग प्रचंड दाटीवाटीचा आहे. करोना संकटात सुरक्षित वावरचे येथे पालन होणे शक्य नाही. त्यामुळेच हा बाजार खारघर येथे मोकळ्या ठिकाणी हलवला जाईल, असा निर्णय इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने घेतला आहे.
उद्योजकांची अशीही अडचण
हा बाजार मुंबईची जुनी ओळख आहे. ती ओळख पुसता येणार नाही. झवेरी बाजारात ४ लाख कारागीर काम करतात. केवळ कारागिरांना येथून हलवले तरी रोज खारघरहून तयार दागिने घेऊन येथे येणे सुरक्षेच्या दृष्टीने जोखमीचे आहे.