टिकटाॅक व्हिडीओ करण्यासाठी चाेरले महागडे कॅमेरे

- Advertisement -

पुणे : टिकटाॅकचे वेड काेणाकडून काय करवून घेईल याचा नेम नाही. अशीच एक घटना पुण्यात समाेर आली आहे. टिकटाॅकच्या माेहापायी एकाने लग्न समारंभामध्ये जात थेट महागड्या कॅमेराचीच बॅग चाेरुन नेली. याप्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासांमध्ये आराेपीला अटक केली आहे.

प्रतिक गव्हाणे (वय 19) असे अटक केलेल्या आराेपीचे नाव आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी फिर्यादी महेश पवार यांनी मगरपट्टा येथे एका लग्नाच्या शुटींगचे काम घेतले हाेते. लग्न सायंकाळचे असल्यामुळे पवार हे लाईटींगच्या कामात व्यस्त हाेते. त्यावेळी त्यांची एक कॅमेऱ्याची बॅग चाेरी झाली. बॅग चाेरी झाल्याचे त्यांच्या रात्री उशीरा लक्षात आले. त्यांनी बॅगेचा शाेध घेतला परंतु त्यांना ती कुठे सापडली नाही. लग्नाच्या गडबडीत बॅग काेणाकडे गेली असेल म्हणून त्यांनी तक्रार न करता सगळ्यांकडे चाैकशी केली. जेव्हा काेणाकडेच बॅगचा तपास लागला नाही त्यावेळी त्यांनी हडपसर पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

पाेलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटिव्ही कॅमेरे तपासले. त्यावेळी एक व्यक्ती कॅमेराची बॅग चाेरी करुन घेऊन जात असल्याचे दिसले. पाेलिसांनी खबऱ्यांकडून माहिती मिळवली असता ती व्यक्ती प्रतिक गव्हाणे असल्याचे निष्पन्न झाले. पाेलिसांनी त्याचा शाेध घेऊन ताब्यात घेतले. त्याच्याकडे चाैकशी केली असता, आराेपीला फाेटाेग्राफीचा तसेच टिकटाॅकचा छंद आहे. परंतु महागडे कॅमेरे घेऊ शकत नाही म्हणून त्याने शक्कल लढवून श्रीमंताच्या लग्नात आलेल्या फाेटाेग्राफरचा कॅमेरा व त्याचे साहीत्य चाेरायची कल्पना शाेधून काढली. आराेपीने मगरपट्टा या ठिकाणी जाऊन चांगले कपडे परिधान करुन तेथील जेवणावर ताव मारुन फाेटाेग्राफरचे लक्ष नसताना कॅमेराची बॅग लांबवल्याचे समाेर आले. पाेलिसांनी आराेपीकडून सामानाची बॅग हस्तगत केली आहे.

- Advertisement -