Home ताज्या बातम्या ‘टिक’ की ‘टॉक’… या Tik Tok च्या क्रेझचं करायचं काय?

‘टिक’ की ‘टॉक’… या Tik Tok च्या क्रेझचं करायचं काय?

पोकिमॉनच्या मागे धावणारे आम्ही ब्लू वेलच्या जाळयात अडकलो, तेथून बाहेर पडताच पबजीच्या नादी लागलो. आता सगळं जाऊ दे बाजूला टिक टॉक फेमस करतंय आम्हाला… Tik Tok साधारण वर्षभरापूर्वी लोकप्रिय झालेलं एक अ‍ॅप. वेगवेगळ्या गाण्यावर थिरकणारी मंडळी तर कधी चित्रपटातील प्रसिद्ध संवादावर अभिनयाची हौस भागवणारी तरुणाई. 3 वर्षाच्या चिमुकल्यापासून 80 वर्षांच्या आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांना या अ‍ॅपने भुरळ घातली आहे.

टिक टॉक या अ‍ॅपने अनेकांना अवघ्या काही दिवसांत सेलिब्रेटी केलं, काहींचे जीव गेले तर या अ‍ॅपमुळे एका महिलेला काही वर्षांपासून गायब असलेला नवरा मिळाला. मात्र आता जास्तीतजास्त लाईक मिळवण्याच्या नादात आक्षेपार्ह, वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केले जातात. तरुणाईमध्ये जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली. एका आभासी जगात ते गुंतत चालले आहेत. टिक टॉकमुळे होणाऱ्या नकारात्मक परिणामामुळे हे अ‍ॅप कायद्याच्या कचाट्यात सापडले होते तर काही काळ यावर बंदी घालण्यात आली होती. गुगलने ही प्ले स्टोरवरून ते हटवले होते. मात्र एकंदरीत एवढं सगळं होऊन देखील टिक टॉकची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहे. टिक टॉकची क्रेझ तरुणाईसाठी घातक फेझ आहे की फक्त विरंगुळा? या अ‍ॅपपुढच्या रकान्यात बरोबरची ‘टिक’ करावी की ‘टॉक’ करून ते उडवून द्यावं, यावर तरुणांशी साधलेला संवाद….

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमीच वाईट असतो. टिक टॉकबाबतही सध्या तसंच झालं आहे. अभिनयाची आवड असणाऱ्यांसाठी टिक टॉक हा उत्तम पर्याय आहे. अनेकांना यामुळे थोड्याच दिवसांत प्रसिद्धी मिळली आहे. एका लिमिटपर्यंत टिक टॉकचा वापर करायला हवा. टिक टॉकवर व्हिडीओ पोस्ट करताना सामाजिक जबाबदारीचे भान राखणे गरजेचे आहे. 

– दिपाली गावडे, कांजुरमार्ग

आजच्या मुलांचा टिक टॉक वापरण्याकडे कल वाढला आहे. लहान मुलांना देखील टिक टॉकवर व्हिडिओ बनवायला मजा येते. मात्र यामुळे मुलांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यताही असते. टिक टॉकवर व्हिडिओ पाहायला सुरुवात केली की मुलं आजुबाजूच्या गोष्टी विसरून जातात. विद्यार्थ्यांच्या मनावर त्यामुळे वाईट परिणाम होत असल्याने त्यावर बंदी घातली पाहिजे.

– प्रियांका जाधव, लालबाग

टिक टॉकवर व्हिडिओ करताना धमाल येते. मित्र-मैत्रिणींसोबत व्हिडीओ तयार करताना खूप भारी वाटतं. टिक टॉकवरची बंदी उठवली हे खूप चांगलं झालं. आपल्यातील सुप्त गुणांना वाव द्यायची संधी मिळते. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात एक विरंगुळा म्हणून टिक टॉकचा वापर करायला हवा. अनेकजण टिक टॉकच्या नकारात्मक बाजू सांगतात पण सकारात्मक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण टिक टॉकच्या व्हिडिओने मुलांना प्रसिद्धी मिळते. 

– सौरभ पवार, ठाणे

टिक टॉकवरचे युजर्स आजकाल धर्मावर भाष्य करणारे काही व्हिडीओ तयार करतात. हे एक म्युझिकल अ‍ॅप असून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. काही जण जुन्या आणि नव्या गाण्याची सांगड घालतात तर काही जण आयुष्याबाबतचे सल्ले देतात. टिक टॉकमुळे समाजासाठी घातक ठरणाऱ्या गोष्टी देखील घडत आहेत. त्यामुळे टिक टॉकचा वापर केवळ सकारात्मक आणि चांगल्या गोष्टींसाठी करण्यात यावा. 

– अपर्णा गमरे, पुणे

टिक टॉक या अ‍ॅपबद्दल अनेकांकडून सुरुवातीला ऐकलं होतं. मात्र त्यानंतर स्वत: डाऊनलोड करून व्हिडीओ तयार करायला सुरुवात केली. खूप मजा येते हे करताना मात्र व्हिडीओ करताना केवळ मनोरंजन म्हणून ते तयार करावेत. वादग्रस्त व्हिडीओ तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. 

– महेश सकपाळ, दिवा

लाखो मुलांवर सध्या टिक टॉक या अ‍ॅपचा प्रभाव आहे. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्यासोबतचे असंख्य व्हिडीओ ते सातत्याने शेअर करत असतात. व्हिडीओ शेअर करणं ही चांगली गोष्ट आहे पण याचा तरुणांच्या शरिरावर आणि मनावर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे केवळ आनंद म्हणून टिक टॉकचा योग्य वापर करणं महत्त्वाचं आहे. 

– सिद्धी परब, भांडूप 

tik tok user made hatred video on tabrej ansari mumbai cyder cell filed case | TikTok वर तबरेजच्या हत्येबाबत वादग्रस्त व्हिडीओ, 5 जणांवर गुन्हा दाखल