‘जीव माझा गुंतला’ ही मालिका काही दिवसांपूर्वीच सुरु झाली आहे. या मालिकेतून सौरभ चौगुले हा नवा चेहरा मुख्य भूमिकेत दिसतोय. एकांकिका प्रायोगिक नाटक, राज्य नाट्यस्पर्धा असा प्रवास करत तो आता टीव्हीच्या पडद्यावर आलाय. तसंच यापूर्वी ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन’ची उपविजेती ठरलेली अभिनेत्री योगिता चव्हाणदेखील या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. ‘सोन्याची पावलं’ या मालिकेतून आदित्य दुर्वे आणि ज्योती नेमसे ही नवी जोडी भेटीला येतेय.
या आहेत नव्या मालिका
- सारेगमप लिटिल चॅम्प्स
- जीव माझा गुंतला
- कोण होणार करोडपती?
- अजूनही बरसात आहे
- सोन्याची पावलं
- जय भवानी जय शिवाजी
- बिग बॉस मराठी
लोकप्रिय कलाकार
नव्या मालिकांच्या निमित्तानं लोकप्रिय कलाकार टीव्हीवर पुनरागमन करत आहेत. उमेश कामत आणि मुक्ता बर्वे तब्बल आठ वर्षांनंतर एकत्र काम करत असून ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत ते दिसणार आहेत. अभिनेता भूषण प्रधान आणि ज्येष्ठ अभिनेते अजिंक्य देव हे ‘जय भवानी जय शिवाजी’ या ऐतिहासिक मालिकेतून प्रेक्षकांचं रंजन आणि प्रबोधन करणार आहेत.
रिअॅलिटी शोचं विश्व
नुकतंच ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चं नवं पर्व सुरु झालं आहे. या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकपसंती मिळतेय. या शोसह ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाची चांगलीच हवा तयार होताना दिसतेय. हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर ‘कोण होणार कारोडपती’च्या निमित्तानं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.
प्राइम टाइम वाढवला
शेवटावर आलेल्या मालिकांची जागा नव्या मालिका घेणारच. पण, यातही प्रत्येक वाहिनीची एक आखणी आणि दृष्टी असते. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नाविन्यपूर्ण काही देण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. ही सकारात्मक स्पर्धा प्रेक्षकांसाठी अधिकाधिक मनोरंजक कार्यक्रम घेऊन येईल. आम्ही प्राइम टाइमची वेळ वाढवली आहे. संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरापर्यंत विविधांगी मालिका आणि कार्यक्रम प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करतोय.
– दीपक राजाध्यक्ष, प्रोग्रामिंग हेड, कलर्स मराठी