टीसीएसला अपेक्षेपेक्षा जास्त नफा

- Advertisement -

मुंबई :भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा पुरवठादार कंपनी असलेल्या टीसीएसच्या पहिल्या तिमाहीतील नफ्यात 10.8 टक्के वाढ होऊन तो 8,131 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्यावर्षी पहिल्या तिमाहीत कंपनीला 7,340 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

कंपनीचा महसूल 11.4 टक्‍क्‍यांनी वाढून 38,172 कोटी रुपये झाला आहे. या ताळेबंदाबाबत समाधान व्यक्त करताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी सांगितले की, आम्ही नव्या युगाचे तंत्रज्ञान स्वीकारून महसूल वाढविला आहे. डिजिटल क्षेत्रातून आलेला महसूल 32% आहे. या तिमाहीत कंपनीच्या कर्मचाऱ्यांत 12,356 इतकी वाढ होऊन कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या 4,36,611 इतकी झाली.

आगामी काळातही कंपनीचा नफा आणि महसूल वाढण्याची शक्‍यता आहे. कंपनीने या तिमाहीसाठी प्रतिशेअर 5 टक्के लाभांश जाहीर केला. मात्र, ताळेबंद जाहीर करण्यापूर्वी कंपनीच्या शेअरच्या भावात दोन टक्के घट झाली होती.

- Advertisement -