टॅक्सी महागणार कि बेस्ट स्वस्त होणार?

- Advertisement -

मुंबई: एकीकडे मुंबईच्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी भाडेवाढीसंबंधी ग्राहक पंचायत बरोबर झालेली बैठक शुक्रवारी फिस्कटली होती, तर दुसरीकडे बेस्ट समितीच्या सभेत समिती सदस्यांनी बेस्टच्या भाडे कपातीचा प्रस्ताव पुर्नविचारासाठी परत पाठविला होता. मात्र मंगळवारी या दोन्ही विषयांवर चर्चा आणि अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. यासाठी मुंबई टॅक्सी युनियन यांच्या सोबतच परिवहन मंत्र्यांबरोबर बैठक बोलविण्यात आली आहे. तर बेस्टच्या भाडे कपातीच्या प्रस्तावार बेस्ट प्रशासनाने तातडीने बेस्ट समिती सभा बोलवली आहे. त्यामुळे यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोट्यवधींच्या कर्जात आणि तोट्याच्या गाळात अडकलेल्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महापालिकेने सहा महिन्यांसाठी ६०० कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. मात्र त्यासाठी बेस्टचे किमान भाडे पाच रुपये करुन कार्यवाही सुरू करण्याचे आदेश करारात देण्यात आले. त्यानुसार बेस्ट भाडे कपातीचा प्रस्ताव बेस्ट समितीसमोर आला, मात्र तो परत पाठवण्यात आला. अखेर बेस्ट प्रशासनाने बेस्ट भाडे कपातीवर कृती आराखडा अहवाल तयार केला असून तो मंगळवारी बेस्ट समिती सभेत सादर करण्यात येणार आहे. त्यावर पुन्हा आडकाठी आणली जाणार की मंजुरी दिली जाणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅक्सी भाडेवाढीवर 
परिवहन मंत्री दिवाकर रावते टॅक्सीच्या भाडेवाढीबद्दल सकारात्मकता दाखविल्यानंतर परिवहन विभाग, ग्राहक पंचायत आणि मुंबई टॅक्सी युनियन यांच्या शुक्रवारी मंत्रालयात टॅक्सी भाडेवाढी संबंधित बैठक झाली होती. मात्र ग्राहक पंचायतने खटुआ समितीच्या शिफारशीनुसार हप्पी अव्हरमध्ये टॅक्सीच्या प्रवाशांना सवलत देण्याची मागणी केली आहे. आता मंगळवारी यासंबंधी परिवहन विभाग, ग्राहक पंचायत आणि मुंबई टॅक्सी युनियन यांच्या सोबतच परिवहन मंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे. या बैठकीत टॅक्सी भाडेवाढी संबंधित प्रश्न सुटणार असल्याची आशा मुंबई टॅक्सी युनियनकडून व्यक्ती केली गेली आहे.

- Advertisement -