Home शहरे पुणे टोमॅटोची आवक दुपटीने वाढल्याने टोमॅटोचे दर घसरले

टोमॅटोची आवक दुपटीने वाढल्याने टोमॅटोचे दर घसरले

0

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (दि.10) टोमॅटोची आवक दुपटीने वाढल्याने टोमॅटोचे दर घसरले. त्यामुळे अगदी चार दिवसांपूर्वी चढ्यादराने होणारी टोमॅटोची विक्री 20 ते 25 रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. चांगला दर मिळण्याच्या अपेक्षेने माल पाठविलेल्या शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण अडीच ते तीन हजार पेट्या टोमॅटोची आवक होत असते. मात्र, गुरुवारी (दि.10) ही आवक अचानकपणे दुपटीने वाढली. पाच ते साडेपाच हजार पेट्यांची आवक झाली. पुणे जिल्ह्याच्या विविध भागांबरोबरच सांगली, सातारा, नाशिक, सोलापुर या भागांतून टोमॅटोची आवक झाली.

काही दिवसांपूर्वी मुंबई व वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक घटल्याने टोमॅटोचा दर 80 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा झाला.

दरम्यान, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येदेखील चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पाठविल्याने टोमॅटोची आवक दुपटीने वाढली. त्यामुळे 30 रुपये प्रतिकिलो दराने होणारी टोमॅटोची विक्री 20 ते 25 रुपयांवर घसरली आहे. पावसामुळे माल खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने ही आवक वाढली आहे, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले.