ही जबाबदारी स्वीकारण्यामागची भावना व्यक्त करताना मृण्मयी म्हणाली, ‘मी स्वतः अकरावीपर्यंत शास्त्रीय संगीत शिकली आहे. माझी आई आणि बहीण गौतमी दोघी उत्तम गातात त्यामुळे घरी संगीताचा वारसा आहे. ‘सारेगमप’ या कार्यक्रमाचं मी सूत्रसंचालन करावं हे माझ्या आईचं स्वप्न होतं त्यामुळे या कार्यक्रमासाठी मला विचारण्यात आलं तेव्हा मी लगेचच होकार दिला. मुळातच गाणं हा विषयच माझ्या खूप जवळचा आहे त्यामुळे मी सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वासाठी खूप उत्सुक आहे.
‘ सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना सामोरं जावं लागणाऱ्या आव्हानांबद्दल ती म्हणाली, ‘प्रत्येक सूत्रसंचालकानं उत्स्फूर्त असणं अतिशय महत्त्वाचं आहे. मुळातच मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांना सांभाळणं अवघड असतं. त्यांना बोलतं करण्याचं, त्यांचा आत्मविश्वास कायम ठेवण्याचं, कधी एखाद्याचं गाणं वाईट होऊ शकतं त्यावेळी त्यांना धीर देण्याचं आव्हान माझ्यासमोर आहे. हे मला उत्तमरीत्या जमेल अशी आशा आहे.’