मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि कळवा स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून पडलेल्या एका महिलेला गुरुवारी मोटरमननं वाचवलं. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडली.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकलच्या महिला डब्यातून एक महिला मुंब्रा आणि कळवा स्थानकादरम्यान खाली पडली. डब्यातील गर्दीमुळे हा प्रकार घडला. डब्यातील महिला प्रवाशांनी तात्काळ अत्यावश्यक सेवेची साखळी खेचून लोकलच्या मोटरमनला संकेत दिले. लोकलचा मोटरमन ए.ए.खान यांनी तातडीने लोकल थांबवली व रेल्वेचे सुरक्षारक्षक सुधीर मोरे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर खान स्वत: लोकलमधून खाली उतरले आणि जखमी अवस्थेत पडलेल्या महिलेला उचलून कळवा स्थानकावर आणलं. जखमी महिलेचे नातेवाईक त्याच लोकलमध्ये असल्याने त्यांना कळवण्यात आलं आणि महिलेवर तात्काळ प्रथमोपचार करण्यात आले. मोटरमन ए.ए.खान यांनी प्रसंगावधान बाळगून केलेल्या मदतीचं सर्वांनी कौतुक केलं.
महिलेला गंभीर दुखापत झाली नसली तरी तात्काळ उपचार मिळाल्याने आणि नातेवाईकांशी संपर्क झाल्याने तिला स्थानकावरूनच परस्पर घरी जाता आलं. महिलेल्या नातेवाईकांनी कोणत्याही प्रकारची तक्रारीची नोंद रेल्वे पोलिसांत केली नाही.