ठाण्यात मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदिवासी बांधवांसोबत साजरी केली आनंदाची दिवाळी – महासंवाद

    - Advertisement -

    ठाणे,दि.१०(जिमाका):- दीपावलीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जात असताना, संकटांचा आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकरी व आदिवासी बांधवांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे चित्र ठाण्यात पाहायला मिळाले. १४६ ओवळा-माजिवडा मतदारसंघातील घोडबंदर रोड येथील पानखंडा येथे आयोजित खास उपक्रमात महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी स्थानिक आदिवासी शेतकरी आणि शेतमजुरांसोबत प्रत्यक्ष उपस्थित राहून दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.
    शासनाचा कारभार केवळ प्रशासकीय निर्णय आणि आर्थिक मदतीपुरता मर्यादित न ठेवता, प्रत्यक्ष तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे हेच एका संवेदनशील प्रशासनाचे लक्षण असते. याच भावनेतून या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
    कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व आदरांजली वाहून करण्यात आली. यावेळी स्थानिक आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत आणि लोकनृत्याच्या तालावर मान्यवरांचे स्वागत केले.


    या सोहळ्यात आदिवासी कुटुंबांना दिवाळीचा आनंदाचा शिधा आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच, भावी पिढीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी लहान विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व शालेय वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले.
    संवेदनशील प्रशासनाचा व भूमिकेचा पुनरुच्चार करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना, खासदार, आमदारांना आवाहन केले होते की, पूर्ण राज्यामध्ये दुष्काळाची आणि बिकट परिस्थिती असताना आपण केवळ कार्यालयात बसून न राहता प्रत्येक गावा-खेड्यामध्ये जाऊन दुष्काळग्रस्त शेतकरी व आदिवासी बांधवांच्या दुःखावर फुंकर घातली पाहिजे.सर्वसामान्य नागरिक आणि आपले आदिवासी बांधव, शेतमजूर यांच्यासोबत दिवाळी साजरी केली पाहिजे. आपण आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतोच, परंतु जेव्हा अशा घटकांच्या दारात जाऊन त्यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेतो, तेव्हा त्यांना मिळणारा मानसिक आधार आणि आत्मविश्वास मोलाचा असतो. शासनाची मदत तर त्यांच्यापर्यंत पोहोचतच आहे, पण संकटकाळात ‘शासन आणि आपले लोकप्रतिनिधी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत’ हा विश्वास निर्माण करणे हेच या शासनाचे मुख्य धोरण आहे.”


    केवळ औपचारिकता न पाळता मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या परिवारासह आदिवासी बांधवांच्या घरी जात जमिनीवर बसून त्यांच्यासोबत दिवाळीच्या फराळाचा मनमोकळा आस्वाद घेतला. त्यांच्या अडचणी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतीशी संबंधित समस्या अत्यंत आत्मीयतेने जाणून घेत, “कोणत्याही परिस्थितीत आपल्या बळीराज्याला आणि आदिवासी बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी दिला.
    दुष्काळ, अनियमित पाऊस आणि विविध अडचणींमुळे हतबल झालेल्या शेतकरी व आदिवासी बांधवांच्या मनात आशेचा किरण निर्माण करणे, हेच या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते. प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची ही आपुलकीची भेट केवळ सण साजरा करण्यापुरती नसून, नागरिकांना भावनिक व सामाजिक आधार देणारी ठरली आहे.
    अशा उपक्रमांमधून शासन हे खऱ्या अर्थाने जनतेच्या दारी पोहोचून संवेदनशीलतेचा मानवी चेहरा अधोरेखित करत असल्याचे दिसून येत आहे.
    0000000

    - Advertisement -