Home गुन्हा डिकॉयच्या ‘विश्वासा’वरच प्रश्नचिन्ह

डिकॉयच्या ‘विश्वासा’वरच प्रश्नचिन्ह

0

लाच घेणारा जसा गुन्हेगार, तसा लाच देणारा हादेखील कायद्याच्या भाषेत गुन्हेगार मानला गेला आहे. कारण कायदेशीर कामासाठी स्वत:हून पैसे देण्यास तयार व्हावे व समोरच्या व्यक्तीस लाच घेण्यासाठी उद्युक्त करणे हा कायद्याने गुन्हा मानला गेला असेल तर मग मध्यरात्री सावजाच्या शोधात रस्त्याच्या कडेला अंधारात वा सार्वजनिक ठिकाणी नट्टापट्टा करून माणसाच्या वासनांधप्रवृत्ती जागृत करून त्याला गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे हादेखील गुन्हाच मानला गेला आहे. त्यातून अनेक वारांगणांना यापूर्वीच पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे. परंतु ना वारांगणांनी त्यांचा व्यवसाय सोडला ना, त्यांच्या शरीरपट्टीवर भाळणाऱ्या वासनांधांनी. कारण वासनांधांची जितकी गरज स्त्री आहे, तितकीच गरज ही शरीरविक्रय करणा-या वारांगणांना वासनांधांची आहे. किंबहुना त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. दोघांच्या संमतीनेच होत असलेला हा ‘व्यवसाय’ तसा तर त्यांच्यादृष्टीने कायदेशीर. त्यामुळे त्यातून एकमेकांनी कधी कोणाच्या विरोधात तक्रार केलेली ऐकीवात नाही. मात्र नाशिक पोलीस आयुक्तांनी राबविलेल्या नवीन ‘डिकॉय’ या उपक्रमातून अचानक वासनांधांच्या भावना चाळविल्या जाणे व त्यातून रस्त्याच्या कडेला नट्टापट्टा करून उभ्या राहणा-या महिला, तरुणींची छेड काढल्या जाण्याच्या लागोपाठ घटना घडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, ते पाहता यात दोष कुणाचा? रात्री-अपरात्री सावजाच्या शोधात असणा-या वासनांधांचा की, त्याला प्रवृत्त करू पाहणा-या पोलिसांचा?


हैदराबाद येथील पशुवैद्यकीय महिला डॉक्टरचे अपहरण व बलात्कारानंतरच्या निघृण हत्येने संपूर्ण देश आजही शोकमग्न व तितकाच संतप्त आहे. महिला, तरुणींच्या असाहय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्या शरीराचे लचके तोडणाऱ्यांना फाशी देण्याची होणारी सार्वत्रिक मागणी कायद्याच्या कसोटीवर अद्याप उतरलेली नसली तरी, त्यासाठी समाजमनाचा रेटा असाच कायम राहिला तर ते शक्य नाही असे मुळीच नाही. परंतु समाजातील मूठभर वासनांधांनी आपली शारीरिक गरज भागविण्यासाठी क्रूर पद्धत अवलंबिली म्हणून संपूर्ण समाजच त्याची पुनरावृत्ती करेल असा अंदाज बांधणेदेखील तितकेच चुकीचे. मात्र असा संभाव्य धोका ओळखून नाशिक पोलीस आयुक्तालयाने शहरातील वीस लाख लोकसंख्येकडे याच नजरेतून पाहून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी जो काही जालीम (?) उपाय त्यांच्या ‘डिकॉय’ या उपक्रमातून हाती घेतला आहे, ते पाहता नाशिक शहर जणू काही संपूर्ण भूतलावरील काही तरी वेगळेच शहर व तेथे राहणारे सारे स्त्री-पुरुष त्याच मानसिकतेतून उपजले आहेत असे मानावे काय? महिला, तरुणींना उपभोगाची वस्तू मानणे व त्यातून त्यांची खरेदी करण्यासाठी रात्री-अपरात्री शोध घेत फिरत राहणे हा एकमेव धंदा काही मूठभर वासनांधांचा असेलही म्हणून त्यासाठी आपल्यातीलच चारित्र्यशील, सौभाग्यवतींना व कार्यक्षम महिला कर्मचारी, अधिका-यांना रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला संशयास्पद उभे करण्यात कसली आली उपक्रमशीलता? मुळात शरीरविक्रय करणा-या महिला, तरुणी कुठे व कसा व्यवसाय करतात याची माहिती वासनांधांपेक्षा त्या त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्तव्यदक्ष पोलीस अधिका-यांना चांगलीच ठावूक आहे. अनेक ठिकाणचे व्यवसाय पोलीस अधिका-यांच्या वरदहस्ताने आजही सुरू आहेत, तर ज्या महिला, तरुणींची काळजी वाहत पोलीस आयुक्तांनी ‘डिकॉय’ म्हणजे सापळा रचून सावज टिपण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, अशा अनेक महिला व तरुणींना दिवसाढवळ्या वासनांधांच्या वाईट नजरेला व त्यांच्या कृत्यांना बळी पडावे लागल्याच्या घटना पोलीस दप्तरात नुसत्याच नोंदी होवून बंद पडल्या आहेत. त्या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन तक्रार दाखल असलेल्या वासनांधांच्या मुसक्या आवळण्याचे शौर्य जरी पोलिसांनी दाखविले तरी, शहरात एकट्या, दुकट्या महिला, तरुणींकडे वाईट नजरेने पाहण्याची हिम्मत कोणी करू शकेल असे वाटत नाही. परंतु सार्वजनिक व सामसूम ठिकाणी रात्रीच्या वेळी उभे राहून पुरुषांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी प्रयत्नशील राहणे, त्याच्या भावना चाळवून सापळ्यात अडकवून गुन्हा दाखल करूनच जर समाजातील अपप्रवृत्ती ठेचली वा नष्ट होणार असल्याचा पोलिसांचा समज असेल तर रात्रीच कशाला त्यांनी दिवसाही सर्व कामेधंदे बाजूला सारून ‘डिकॉय’चा उपक्रम राबविण्यास कोणाची हरकत असण्याचे कारण नसावे. परंतु निव्वळ उपक्रम म्हणून एखादी गोेष्ट जाणीवपूर्वक केली जाते, त्याच्यातील नावीन्यपणदेखील काही दिवसांपर्यंतच मर्यादित असते हे आजवरच्या पोलीस आयुक्तांनी राबविलेल्या परंतु बंद पडलेल्या उपक्रमांतून यापूर्वीच सिद्ध झाले आहे.