Home ताज्या बातम्या डेक्कन क्वीनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने प्रवाशाचा मृत्यू

डेक्कन क्वीनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने प्रवाशाचा मृत्यू

0


ठळक मुद्दे
खंडाळा रेल्वे स्थानकात त्यांचा मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात

पुणे : लोणावळा स्थानकातून डेक्कन क्वीनमध्ये चढलेल्या प्रवाशाला लगेचच हृदयविकाराचा झटका आल्याने जागेवरच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. खंडाळा रेल्वे स्थानकात त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
भैरूलाल मोतीलाल जैन (वय ५०, रा. तळेगाव) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. डेक्कन क्वीन पुणे रेल्वे स्थानकातून नियमित वेळेत मुंबईकडे रवाना झाली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही गाडी लोणावळा स्थानकात पोहचली. भैरूलाल जैन यांचे लोणावळा ते मुंबई असे आरक्षण होते. त्यानुसार ते डी१ डब्ब्यामधील आपल्या ३० क्रमांकाच्या आसनाकडे गेले. तिथे बसल्यानंतर त्यांना लगेच छातीत दुखू लागले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने जवळील प्रवाशांना त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी डब्यामध्ये दोन डॉक्टर्स प्रवास करत होते. त्यांनीही जैन यांच्यावर प्रथमोपचार केले. पण ते बेशुध्द पडले होते. तोपर्यंत स्थानकातून गाडी पुढे गेल्याने प्रवाशांना आपत्कालीन साखळी ओढून गाडी थांबविली. चालकाने याबाबत माहिती घेऊन रेल्वे स्थानकात संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. पण रेल्वे स्थानक सोडून गाडी काहीशी पुढे जाऊन थांबलेली असल्याने खंडाळा स्थानकाकडे रवाना करण्यात आली. तोपर्यंत रेल्वे डॉक्टरांनी कारने खंडाळा स्थानक गाठले. गाडी तिथे पोहचल्यानंतर तपासणी केली असता जैन यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार जैन यांनी दिली.
दरम्यान, साखळी ओढूनही लोणावळा स्थानकात गाडी थांबविण्यात न आल्याने जैन यांना तातडीने उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, रेल्वे अधिकाºयांनी हा दावा फेटाळून लावला आहे. रेल्वे प्रवासी गु्रपच्या अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या, साखळी ओढल्यानंतर गाडी लोणावळा स्थानकापासून थोडी पुढे जाऊन थांबली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला दोष देता येणार नाही. रेल्वेमध्ये दोन डॉक्टरही होते. त्यांनीही शर्थीचे प्रयत्न केले पण जागेवर त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले.