
वर्ष २०२३-२०२४ मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाची कामगिरी
अमरावती, दि. २१ : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान आणि स्पर्धा २०२३-२०२४ मध्ये राज्यस्तरीय पारितोषिकांमध्ये ‘कार्यालयीन व्यवस्थापनात आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन पध्दतींचा अवलंब करणे’ या उपक्रमाबाबत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयास तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांना मुंबई येथे करण्यात आले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात हा पुरस्कार डॉ. निधी पाण्डेय यांना प्रदान करण्यात आला.
विभागीय आयुक्त कार्यालयाने वर्ष २०२३-२०२४ मध्ये अमरावती विभागातील नागरिकांची महसूल विभागाशी निगडीत कामे तसेच प्रशासकीय कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण करुन लोकाभिमूख प्रशासन होण्यासाठी कार्यालयीन व्यवस्थापनात आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन पध्दतींचा अवलंब करण्यात आला. या नाविण्यपूर्ण उपक्रमाची व उत्कृष्ट कार्याची दखल घेत राज्य सरकारने पुरस्कार प्रदान केला आहे. स्मृतीचिन्ह व चार लक्ष रुपयाचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
लोकसभा सर्वसाधारण निवडणूक २०२४ यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात असल्यामुळे ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२३-२०२४’ यावर्षाची पारितोषिके जाहीर करता आली नव्हती. उक्त पारितोषिके ही यावर्षीच्या (2024-2025) पुरस्कारांसोबत जाहीर करण्यात आली.
स्पर्धेत राज्यभरातून शासकीय विभाग, कार्यालये आणि अधिकारी, कर्मचारी यांनी उत्कृष्ट प्रशासकीय कार्य आणि उपक्रम सादर केले. राज्यस्तरीय निवड समितीने प्रस्तावांचे मूल्यांकन करून पारितोषिकांसाठी विजेत्यांची निवड केली आहे. पारितोषिक विजेत्यांना मिळालेली रकम कार्यालयाची सुधारणा किंवा स्पर्धेत पाठवलेल्या प्रस्तावाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी करावी लागणार आहे.
00000