Home ताज्या बातम्या डोंबिवलीतील प्रदूषण कमी झालं नाही तर अधिकाऱ्यांना बांधून ठेवू; मनसे आमदाराचा इशारा

डोंबिवलीतील प्रदूषण कमी झालं नाही तर अधिकाऱ्यांना बांधून ठेवू; मनसे आमदाराचा इशारा

0

डोंबिवली :औद्योगिक प्रदुषणाच्या विळख्यात अडकलेल्या डोंबिवली शहराचं नाव नेहमी चर्चेत असतं. कधी हिरवा पाऊस, नालातल्या घाणं पाणी तर आता चक्क गुलाबी रस्ता डोंबिवलीच्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. इतकचं नाही तर या प्रदुषणामुळे गणेशोत्सवात गणपतीची मूर्तीही काळी पडल्याचं दिसून आलं. त्यामुळे पुन्हा एकदा डोंबिवली शहराच्या प्रदुषणाबाबत वादंग निर्माण झालं आहे. 

या प्रकरणावर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी पर्यावरण विभागाकडे बोट दाखवत हात झटकण्याचं काम केलं आहे. यावरुन मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. डोंबिवलीकर प्रदूषणाच्या विळख्यात असताना मंत्र्यांनी जबाबदारी झटकणं हास्यास्पद आहे. आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आणू नका, प्रदूषण कमी झालं नाही तर अधिकाऱ्यांना बांधून ठेवू असा इशारा कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिला आहे. 

शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी योग्य ती कारवाई केली जावी ही माझीही मागणी आहे. हा विषय मी अनेकदा मांडला. पर्यावरण विभाग आणि विशेषकरुन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या अखात्यारित हा विषय येतो. जे प्रदूषण निर्माण करणारे कारखाने आहेत त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई झाली पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

चार वर्षापूर्वी डोंबिवली एमआयडीसी परिसरात प्रोबेस कंपनीत स्फोट झाला होता. त्यावेळी या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर डोंबिवलीतल्या धोकादायक कंपन्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यावेळी तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी याठिकाणीच्या धोकादायक कंपन्या स्थलांतरित केल्या जातील असं आश्वासन दिलं होतं. मात्र आता सुभाष देसाई यांनी पर्यावरण विभागाकडे याबाबत बोट दाखवले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे डोंबिवली प्रदूषणाबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

प्रदूषणामुळे काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा, भगव्या रंगाचा तेल मिश्रित पाऊस पडला होता. त्यात आता एमआयडीसीतील एक रस्ता रसायन पडल्याने गुलाबी झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात लाल पाणीही दिसून आल्याने नागरिकांमध्ये एकच चर्चा झाली. दरम्यान, गुलाबी रस्त्यांसंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.