हायलाइट्स:
- येत्या १४ जूनला सुशांतसिंह राजपूतच्या निधनाला पूर्ण होणार एक वर्ष
- सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आहे सुशांतच्या आत्महत्येचा मुद्दा
- सुशांतच्या निधनानंतर गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनं केले होते अनेक धक्कादायक खुलासे
सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात ती सोशल मीडियावर चर्चेत राहिली, तिला ट्रोल करण्यात आलं. पण तरीही तिनं मुलाखतीत सुशांतबद्दल अनेक खुलासे केले होते. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. याशिवाय तिनं एनसीबीच्या चौकशीतही काही खुलासे केले ज्याची माहिती एनसीबीकडून देण्यात आली.
रिया चक्रवर्तीन सुशांतबद्दल सर्वात मोठा खुलासा असा केला होता की, सुशांतला बॉलिवूड सोडून जायचं होतं. ‘किस देस में होगा मेरा दिल’ या मालिकेतून करिअरची सुरुवात केलेल्या सुशांतनं ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून स्वतःची वेगळी निर्माण केली. त्यानंतर त्यानं बॉलिवूड पदार्पण केलं ‘काय पो छे’, ‘एम एस धोनी’, ‘पीके’, ‘छिछोरे’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. अशात रिया चक्रवर्तीनं त्याच्या निधनानंतर, सुशांतला बॉलिवूड सोडून मे २०२० मध्ये कूर्गमध्ये सेटल व्हायचं होतं असा खुलासा केला होता ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता.
एनसीबीच्या चौकशीत रिया चक्रवर्तीनं आणखी एक धक्कादायक खुलासा केला होता. ती म्हणाली, ‘ही खूप दुःखद गोष्ट आहे की, एका व्यक्तीच्या निधनानंतर आपण अशा गोष्टींवर बोलत आहोत पण माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये. सुशांत गांजाचे सेवन करत असे. असं म्हणू शकतो की, त्याला व्यसन जडलं होतं कारण तो जवळपास रोजच गांजाचं सेवन करत असे. या व्यतिरिक्त तो त्याची बहीण आणि तिच्या नवऱ्यासोबतही ड्रग्स घेत असे.’
रिया चक्रवर्तीनं पोलीस चौकशीमध्ये सुशांत आणि त्याच्या वडिलांच्या नात्याबाबतही सांगितलं होतं. ती म्हणाली होती, ‘सुशांतनं मला सांगितलं होतं की, जेव्हा तो लहान होता तेव्हापासून त्याचं आणि त्याच्या वडिलांचं नातं फारसं चांगलं नव्हतं. त्याचं त्याच्या आईवर खूप प्रेम होतं. सुशांत मानसिक तणावाच्या समस्येतून जात होता. पण त्याचं महत्त्वाचं कारण त्याची आई होती. तो आपल्या आईशिवाय जगू शकत नव्हता आणि त्यांच्या निधनाआधी त्या स्वतःही मानसिक आजाराच्या शिकार ठरल्या होत्या.’