Home ताज्या बातम्या तक्रारीवर तोडगा ; सेवा पंधरवाडा

तक्रारीवर तोडगा ; सेवा पंधरवाडा

0
तक्रारीवर तोडगा ; सेवा पंधरवाडा

विकासाचे विविध उपक्रम राबवण्यासोबत प्रशासन जनतेचे प्रश्न (तक्रारी) निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील असते. पण, अनेक प्रकरणात काही कारणामुळे किंवा काही शुल्लक चुकांमुळे प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित असतात; नियमित प्रक्रियेत मागे पडतात. यामुळे संबंधिताना व्यवहारात अडचणी येऊ शकतात, अशी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी शासनातर्फे शनिवार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे.

हा पंधरवडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. यात विविध क्षेत्रातील सेवां विषयांचा समावेश आहे. या प्रलंबित तक्रारींबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येणार आहेत.

या पंधरवड्यात आपले सरकार, महावितरण, डी.बी.टी., नागरी सेवा केंद्र, विभागांचे स्वत:चे पोर्टल, अशा वेबपोर्टलवर 10 सप्टेंबर 2022 पर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींचा निपटारा करण्याचे उद्दिष्ट आहे. मदत आणि पुनर्वसन, कृषी, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्राम विकास, नगर विकास, आरोग्य, पाणी पुरवठा, महावितरण,  आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागातील सेवांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. नियमित प्रक्रियेत ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मदत मिळाली नाही, अशा शेतकऱ्यांची प्रकरणे सेवा पंधरवड्यात मार्गी लागतील, अशी आशा आहे. याशिवाय मालमत्ता कराची आकारणी मागणी पत्र, घरांची विजेची जोडणी, शिधापत्रिकांचे वितरण, विविध योजनांसाठी दिव्यांगाना आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रांचे वितरण, विद्यार्थ्यांसाठी सवलतींसाठी गरजेचे असलेले ‘नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र’ अशी दैनंदिन तक्रारींशी संबंधित प्रकरणे निकाली निघतील.

नागपूर जिल्हा प्रशासन ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमासाठी सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्हास्तरीय विभाग प्रमुखांची बैठक घेऊन पंधरवड्याच्या कामाचा आराखडा तयार करून घेतला. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वार रूम’ तयार केला आहे.

सेवा पंधरवड्यात प्रलंबित प्रकरणांपैकी कितीबाबत निर्णय झाला आणि किती शिल्लक राहिलेत याबाबत 5 ऑक्टोबर रोजी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेण्यात येणार आहे. सेवा पंधरवडयातील कामकाजाचा प्रगती अहवाल प्रमाणपत्रासह 10 ऑक्टोबरपर्यंत शासनास सादर करायची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

नागपूर येथे सेवा पंधरवाडयाचा शुभारंभ एकाच दिवशी 13 ठिकाणी करण्यात आला. नागपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात विधानपरिषद सदस्य चंद्रशंखर बावनकुळे, विभागीय आयुक्त माधवी खोडे चौरे, जिल्हाधिकारी विपीन इटनकर,अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शेरींग दोरजे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी., जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधिक्षक विजय मगर, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.जिल्हयातील कळमेश्वर येथे माजी मंत्री आमदार सुनिल केदार उपमरेड व भिवापूर येथे आमदार राजू पारवे यांच्या हस्ते सेवा पंधरवाड्याचे उद्घाटन झाले. याशिवाय सावनेर, काटोल, हिंगणा, रामटेक, मौदा, नरखेड, कुही, कामठी, पारशिवनी या तालुक्यामध्येही उपविभागीय अधिकारी तहसिलदार व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे व दस्तावेजांचे वाटप करण्यात आले.

प्रशासन आपल्या गावी  

ग्रामीण भागातील जनतेचे विविध विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रशासन आपल्या गावी उपक्रम सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. हा उपक्रम तहसीलदारांनी राबवावयाचा आहे. तालुकास्तरीय यंत्रणांची बैठक घेवून तहसीलदार या कार्यक्रमाचे आखणी करतील. या कार्यक्रमाला सर्व तालूकास्तरीय अधिकारी उपस्थित राहतील. यात तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख, वनपरिक्षेत्र अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी व इतरांचा समावेश असेल.

  • प्रवीण टाके

जिल्हा माहिती अधिकारी