पिंपरी : मोटारीमधून आलेल्या तिघा जणांनी एका तरुणाचे अपहरण केले. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी देऊन कारमधील एका महिलेसोबत अश्लील चाळे करायला लावले. त्याचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करून अज्ञात इसमाला पाठवले. ही घटना शुक्रवारी (दि. २६) सकाळी साडेआठ ते दहा वाजण्याच्या दरम्यान औंध रुग्णालय मुख्य प्रवेशद्वाराकडून सांगवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चालत्या मोटारीमध्ये घडली.
याप्रकरणी पीडित तरुणाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन अज्ञात इसम आणि एका अनोळखी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे औंध रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या रस्त्याने जात असताना पांढऱ्या रंगाच्या मोटारीमधून आलेल्या तिघा जणांनी मिळून फिर्यादींचे अपहरण केले. त्यानंतर, त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन मोटारीमध्ये बसलेल्या महिलेसोबत अश्लील चाळे करण्यास भाग पाडले.
तसेच या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करून अज्ञात आरोपीला पाठवले. फिर्यादीला रस्त्यावर सोडून दिले. घटनेनंतर फिर्यादी यांनी सोमवारी (दि. २९) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जी. डी. माने हे करत आहेत.
- Advertisement -