Home बातम्या …तर तुमचंही Twitter अकाऊंट होणार बंद

…तर तुमचंही Twitter अकाऊंट होणार बंद

0

नवी दिल्ली : मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ट्विटर आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. मात्र आता ट्विटरने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ट्विटर लवकरच आपल्या पोर्टलवरून अनेक अकाऊंट्स बंद करण्याचा विचार करत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून साईन इन न केलेले अकाऊंट्स ट्वीटर बंद करणार आहे. तसेच इनअ‍ॅक्टिव्ह युजर्सना सूचना देणारा ई-मेलही ट्विटरकडून पाठवण्यात येत आहे. 11 डिसेंबरपर्यंत युजर्सनी साईन इन न केल्यास त्यांचे अकाऊंट बंद केले जाईल. बंद केलेल्या अकाऊंटचे ‘युजर नेम’ दुसऱ्या युजर्सना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

द वर्जच्या रिपोर्टमध्ये ट्विटरच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘युजर्सना उत्तम सेवा देण्यावर आमचा भर आहे. यानुसार इनअ‍ॅक्टिव्ह युजर्सचे अकाऊंट्स बंद करण्यावर काम सुरू आहे. यामुळे युजर्सना अचूक, विश्वासार्ह माहिती मिळेल आणि ट्विटरवरील त्यांचा विश्वास वाढेल. जास्तीत जास्त लोकांनी ट्विटरचा वापर करावा. त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने प्रयत्न केले जात आहेत.’

ट्विटरने इनअ‍ॅक्टिव्ह युजर्सना सूचना देणारे ईमेल पाठवण्यास सुरुवात केली आहे. पण हे अकाऊंट नेमके कधी बंद करणार याची तारीख जाहीर केलेली नाही. अकाऊंट्स बंद करण्याची प्रक्रिया फक्त एका दिवसात नाही तर काही महिन्यांमध्ये पूर्ण होईल असं देखील म्हटलं आहे. गेल्या सहा महिन्यांपासून लॉग-ईन न केलेल्या अनेक अकाऊंट्सची माहिती मिळवली आहे. अकाऊंट बंद करण्यापूर्वी अशा युजर्सना मेल पाठवून कळवण्यात येणार आहे. ट्विटर 2020 मध्ये युजर्सच्या सुविधेसाठी नवीन फिचर्स आणणार आहे. यादृष्टीने ट्विटरने काम सुरू केले आहे. 

ट्विटरने राजकीय जाहिराती बंद केल्या आहेत. त्यामुळे ट्विटरवर आता राजकीय जाहिराती युजर्सना दिसत नाहीत. ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डॉर्सी यांनी ट्विट करुन यासंबंधीत माहिती दिली होती. इंटरनेटवर जाहिराती खूप ताकदवान आणि प्रभावी ठरतात. व्यावसायिक जाहिरातींपर्यंत ठिक आहे, पण ही ताकद राजकीय जाहिरातींच्या बाबतीत मोठी जोखीम ठरू शकते. राजकारणामध्ये या जाहिरातींचा उपयोग मतांवर प्रभाव पाडण्यासाठी होऊ शकतो, याचा परिणाम लाखो लोकांच्या जीवनावर होण्याची शक्यता असल्याने जॅक पॅट्रिक डॉर्सी यांनी सांगितले होते. त्यामुळे ट्विटरवर राजकीय जाहिराती बंद करण्यात आल्या आहेत. 

खूशखबर! Twitter वर आता एडिट करता येणार ट्वीट; फायदेशीर ठरणार नवं फिचर

सोशल मीडियावर एखादी गोष्ट पोस्ट केल्यानंतर त्यामध्ये चूक असल्यास अथवा अन्य काही कारणांमुळे ती पोस्ट एडिट करायची असल्यास एडिटचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र Twitter वर ट्वीट एडिट करता येत नाही. ट्वीटर युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण फेसबुकप्रमाणेच आता लवकरच ट्वीट एडिट करता येणार आहे. एडिटसाठी Twitter एक नवीन फीचर लॉन्च करणार आहे. ट्वीटरच्या या फीचरद्वारे युजर्सना एडिट केलेले ट्वीट दिसणार आहे मात्र याआधी केलेले मूळ ट्वीटही दिसणार आहे. ट्वीट एडिट करण्यासाठी आणण्यात येणाऱ्या नव्या फीचरचा युजर्सला फायदा होणार आहे. युजर्सकडे ते ट्वीट डिलीट करण्यासाठी 5 ते 30 सेकंदाचा वेळ असणार आहे. त्याच विंडोमध्ये युजर्स ते एडिट करू शकतात.