Home ताज्या बातम्या .तर महापौर, उपमहापौर यांच्यावर कारवाई करा अन् मनपा बरखास्त करा – अजित पवार

.तर महापौर, उपमहापौर यांच्यावर कारवाई करा अन् मनपा बरखास्त करा – अजित पवार

मुंबईत मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी तुंबले आहे. महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या तुंबलेल्या मुंबई संदर्भातील वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेना भाजप सरकारवर निशाणा साधला. पाण्याने मुंबई तुंबली आहे. दरम्यान महापौर, उपमहापौर चुकत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी अजित पवार यांनी केली.

गेल्या तीन-चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळं मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबईत जागोजागी पाणी तुंबले आहे. दरम्यान मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईत कुठेच पाणी तुंबलं नाही असा दावा केला. इतकेच नव्हे तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईला पावसाने झोडपून काढलंय. जनजीवन विस्कळीत झालंय. मात्र ही नैसर्गिक स्थिती आहे, उगीचचं पालिकेला दोष देऊ नका, असे वक्तव्य केले. दरम्यान अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.

२० वर्षापेक्षा जास्त काळ मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. मात्र सगळं व्यवस्थित काम करत आहे असं सांगितलं जातंय. महापौर, उपमहापौर चुकत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा वेळ पडली तर प्रशासक आणा, मनपा बरखास्त करून टाका अशी मागणी अजित पवार यांनी केली.

इतकेच नव्हे तर मुंबई तुंबल्यावर यांच्या कामाची पोलखोल होते त्यामुळे याच्या खोलात जावून चौकशी व्हावी आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा त्याशिवाय यांचे डोळे उघडणार नाही, असेही अजित पवार यांनी म्हंटले.

याचबरोबर मनुष्याला एकदाच जन्म मिळतो त्यामुळे किडयामुंग्यासारखं लोकं मरत असतील तर हे सरकारचे अपयश आहे. हा सरकारचा कमीपणा आहे त्यामुळे याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. त्यामुळे अशा घटना घडू नयेत ही जबाबदारी सरकारने घ्यावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली.