मुंबई, दि. 17 : महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 1 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आज दिले.
महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, सहसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. विखे-पाटील म्हणाले की, गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार असून यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल.
तलाठी/ पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना प्रवास भत्त्यात वाढ देणे, कार्यालयीन भाडे देणे तसेच लॅपटॉप आणि प्रिंटर देण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी. याशिवाय महसूल विभागाअंतर्गत नायब तहसीलदार परीक्षा आणि पदोन्नतीबाबतचे निकष तपासून याबाबत बैठकीचे नियोजन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे-पाटील यावेळी म्हणाले.
००००
वर्षा आंधळे/विसंअ/17.10.22