तारादूतांना मिळाली शाहूकार्याची माहिती

- Advertisement -

कोल्हापूर : बहुजनांचे कैवारी, समाजोद्धारक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ, न्यू पॅलेसची वास्तू, खासबाग, ऐतिहासिक दसरा चौक, भवानी मंडप अशा राजर्षींच्या कार्याचा वसा आणि वारसा जपलेल्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देत बुधवारी ‘सारथी’च्या तारादूतांनी शाहू विचारांचा जागर केला. भवानी मंडपात ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी ताराबाई व शाहू महाराज यांच्यावर व्याख्यान दिले.

मराठा मोर्चाच्या मागणीनंतर छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुण्यात स्थापन झाली. या संस्थेअंतर्गत स्त्री-पुरुष समानता, जातीय सलोखा, स्वच्छता, व्यसनमुक्ती यांवर जनजागृती करण्यासाठी व स्वयंसेवक निर्माण करण्यासाठी तारादूतांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यांच्या नावाने संस्था सुरू झाली आहे, त्या शाहू महाराजांच्या कार्याची माहिती या तारादूतांना व्हावी, यासाठी दोन दिवसांच्या अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत ३२३ तारादूत कोल्हापुरात आले आहेत.

बुधवारी दुपारी त्यांनी कसबा बावड्यातील शाहू जन्मस्थळाला भेट दिली. यावेळी प्रकल्प संचालक अशोक पवार व नितीन हांडे यांनी अभ्यास सहलीचे महत्त्व विशद केले. इतिहास अभ्यासक इंंद्रजित माने यांनी शाहू महाराजांच्या कार्याची माहिती दिली. यानंतर न्यू पॅलेसला भेट देण्यात आली. येथे शाहू छत्रपती यांनी या तारादूतांशी संवाद साधला.

कोल्हापूर पुरालेखागार, टाऊन हॉल म्युझिअम, दसरा चौकनंतर सायंकाळी भवानी मंडप परिसरात तारादूतांनी पथनाट्य सादर केले. यानंतर ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी ताराबाई व शाहू महाराज या विषयावर व्याख्यान दिले. प्रमुख पाहुण्या म्हणून संयोगिताराजे छत्रपती होत्या. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी स्वागत केले. वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले.आज, गुरुवारी पन्हाळा, राधानगरीला भेट देण्यात येणार आहे. शुक्रवारी कोल्हापुरातील उर्वरित वास्तूंना भेट देऊन अभ्यासदौऱ्याची सांगता होईल.

उपमुख्य कार्यालयाची मागणी लावून धरणार
यावेळी इंद्रजित सावंत म्हणाले, शाहू महाराज कोल्हापूर संस्थानचे राजे असल्याने ‘सारथी’चे मुख्य कार्यालय येथेच व्हावे, अशी आमची मागणी होती. मात्र ते पुण्याला झाले. आता उपमुख्य कार्यालय कोल्हापुरात व्हावे, ही मागणी आम्ही नव्या सरकारकडे लावून धरणार आहोत. तसेच मोठ्या प्रमाणात निधी मिळावा, अशी मागणीही करण्यात येणार आहे.

- Advertisement -