
मुंबई, दि. १२ : तारापोरवाला सर्वात जुने मत्स्यालय असून पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे तारापोरवाला मत्स्यालय विकासास तत्वतः मान्यता देण्यात येत असून या उपक्रमाद्वारे मत्स्यालयाला आधुनिक स्वरूप देण्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे मत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.
विधानभवनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनवाढीबाबत उपाययोजनासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ.बी. एन.पाटील, पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक मनोजकुमार सूर्यवंशी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले की, तारापोरवाला मत्स्यालय मुंबईचे आकर्षण असल्यामुळे याला आधुनिक स्वरूप दिल्यास पर्यटन वाढीस मदत होणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाह्य यंत्रणेद्वारे सहाय्यक जिल्हा पर्यटन अधिकाऱ्यांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन दृष्टीने प्रसिद्ध असलेले समुद्र किनाऱ्यावर लाईफ गार्डची तसेच परिसरात स्वच्छतागृहांची सुविधा देण्यात यावी, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले, महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या जिल्ह्याच्या समुद्रकिनारी पायाभूत सुविधा निर्माण केल्यास पर्यटन वाढीला मदत होणार आहे, असे मत मंत्री राणे यांनी व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे गेस्ट हाऊस खासगी भागीदार (Public Private Partner) यांचा समावेश करून चालविण्याची परवानगी देण्याबाबत विचार करण्यात यावा. यासाठी एका गेस्ट हाऊसवर पायलट प्रोजेक्ट राबविण्यात यावा, अशी सूचना श्री. राणे यांनी केली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनासाठी विशेष अनुदान देऊन विकास करण्यात यावा, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.
आगामी फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन वेंगुर्ला येथे करण्यासाठी पर्यटन विभागाने सहकार्य करावे, अशी सूचनाही मंत्री राणे यांनी केली असून पर्यटन मंत्री यांनी यासाठी अनुकूलता दर्शवली.
०००
मोहिनी राणे/ससं/