तिरट जुगारावर छापा; सव्वा दोन लाखांचा ऐवज हस्तगत

- Advertisement -

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या बेकायदा मटका व्यवसायाचा विषय ऐरणीवर आलेला असतानाच संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना तिरट नावाचा हार-जीतीचा तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळताना पोलिसांनी रोख रक्कम, साहित्य, दुचाकी व तीनचाकी वाहनासह २ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून, तिघांना अटक करण्यात आली.

संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माखजन येथील ग्रामपंचायत इमारतीच्या शेजारीच तीन पानी तिरट जुगार खेळला जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली. याबाबत प्रशांत राजाराम पाटील (३२, संगमेश्वर पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

जुगारप्रकरणी ज्या तिघांना अटक करण्यात आली आहे, त्यामध्ये संतोष सोनू येलोंडे (वय ४०), संतोष चारूदत्त पेडणेकर (वय ३५), मौलम युसूफ खोत (६३, सर्व रा. माखजन) यांचा समावेश आहे. या तिघांसह एकूण ६ जणांविरोधात पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. तीन आरोपींची नावे पोलिसांना मिळालेली नाहीत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या ऐवजामध्ये रोख रक्कम, ७ मोटार सायकल्स, एक रिक्षा व लाकडी टेबल, प्लास्टिक खुर्च्या यांचा समावेश आहे.

- Advertisement -