नवी दिल्ली -प्रतिनिधी
गरजेच्यावेळी एटीएममध्ये पैसे नसल्याने अनेकदा आपली गोची होते. पण जास्त काळ ही परिस्थिती राहणार नाही. बॅंकाचे एटीएएम आता जास्त काळ कॅशलेस राहणार नाहीत. रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाने यासंदर्भातील निर्देश जारी केले आहेत. तीन तासांपेक्षा जास्त काळ बॅंक एटीएम कॅशलेस न ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असे झाल्यास बॅंकेवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. छोटी शहरे आणि ग्रामीण भागांतील एटीएममध्ये कित्येक दिवस कॅश नसल्याच्या तक्रारी येतात. छोट्यात छोटी रक्कम काढण्यासाठी नागरिकांना बॅंकांच्या रांगेत उभे राहावे लागते.
बॅंकांच्या एटीएममध्ये असलेल्या सेंसरच्या माध्यमातून रियल टाईमवर किती रक्कम उपलब्ध आहे याची माहिती मिळते. एटीएममधील कॅशच्या ट्रेमध्ये किती कॅश आहे हे बॅंकांना यावरून कळते. कधी एटीएएम रिफिलिंग करायचे आहे हे बॅंकांना यावरून कळते. पण असे असतानाही बॅंका याकडे दुर्लक्ष करतात. छोटे शहर किंवा ग्रामीण भागात बॅंकींग करस्पॉंन्डंटकडे पाठवले जाते. बॅंकींग करस्पॉन्डंट हे कॅशच्या बदल्यात ग्राहकांकडून वेगळा चार्ज वसूल करतात. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन तासाहून अधिक वेळ जर एटीएएममध्ये कॅश नसेल तर बॅंकेवर पेनल्टी लागेल. ही पेनल्टी प्रत्येक विभागाप्रमाणे वेगवेगळी असेल.