पुणे : मनातली भावना व्यक्त करण्यासाठी स्वत:च्याच भाषेतले शब्द सापडत नाहीत, यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही, अशी खंत व्यक्त करत लेखक अरविंद जगताप यांनी तरुणाईला तुुम्ही कधी मराठीत प्रपोज केलंय का? असा प्रश्न विचारला.
अक्षर मानव युवा विभागाच्या वतीने लेखक अरविंद जगताप यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात यावेळी अक्षर मानव युवा विभागाचे अध्यक्ष सृजन वाटवे, समन्वयक विशाल दाभाडे, संतोष रासवे आदी उपस्थित होते. निखिल बेलोटे यांनी जगताप यांच्याशी संवाद साधला.
जगताप म्हणाले, जोपर्यंत इंग्रजीमध्ये ‘आय लव्ह यू’ म्हणत नाही तोपर्यंत प्रेम व्यक्त केल्यासारखंच वाटत नाही, अशी सध्या स्थिती आहे. आपल्याला आपल्या भाषेत प्रेम व्यक्त करता येत नाही, याचं कुणालाही काहीही वाटत नाही. इतकंच नाही तर अनेक छोट्या छोट्या गोष्टी व्यक्त करण्यासाठीही आपण इंग्रजी भाषेचा आधार घेतो. लघवीला जायचंय हे कुठंच आता ऐकायला येत नाही. त्याऐवजी फ्रेश व्हायचंय, टॉयलेटला जायचंय असं ऐकायला येतं, असे सांगत आपली भाषा मनातले भाव व्यक्त करण्यासाठी इतकी तोकडी नक्कीच नाही, हा मुद्दा अधोरेखित केला.
काहीजण बोलताना एक भाषा वापरतात आणि लिहिताना मात्र वेगळ्या भाषेत लिहितात. प्रत्येकानं त्याच्या भाषेतच लिहिलं पाहिजे, तेच लिखाण अस्सल असतं. कधी नव्हे ते अशा अस्सल भाषेत अलीकडे लिहिलं जात आहे. पण त्याचं प्रमाण आणखी वाढलं पाहिजे, असे नमूद केले.
लेखक म्हणून जगायला मला खूप आवडतं. पण लेखन ही व्यायामासारखी गोष्ट नाही. म्हणजे ठरवून लिहिता येत नाही. लेखन हे जमण्यावर असतं. थोडं सुचायला खूप काही जगवंही लागतं, असंही जगताप यांनी सांगितलं. चित्रपटासाठी लिखाण करतानाचे अनुभव या अनुषंगाने श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी मनमुरादपणे उत्तरे दिली.
तुम्ही कधी मराठीत प्रपोज केलंय? अरविंद जगताप
- Advertisement -