याच पार्श्वभूमीवर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर मानसिक आरोग्याबद्दल व्यक्त झाला आहे. मानसिक आरोग्य आणि स्वतःकडे लक्ष द्या; असा सल्ला तो सर्वांना देतोय.
सिद्धार्थ नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्यातच सिद्धार्थनं शेअर केलेल्या या एका पोस्टनं सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. यात तो लिहितो, ‘तुला काय हवंय? हा प्रश्न स्वत:ला विचारल्यावर काय उत्तर येतं? कुणाचा आवाज ऐकू येतो? तुझाच? की त्यांचा? त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या गरजा, आणि त्यांच्या इच्छा आरडा ओरडा करू लागतात? का हाताची घडी घालून उभा असलेला तुझा आवाज घुमतो तुझ्या कानात? त्यांना जरा बाहेर काढून दार लावशील? आणि आरशात बघशील एकदा? असं म्हणतात की स्वत:चा आवाज डोळ्यांतून दिसतो. टक लावून बघू शकतोस स्वत:कडे? नक्की काय हवंय? काय होतंय? पण मग परत विचार काय हवंय? उत्तर मिळेपर्यंत सोडू नकोस.’ सिद्धार्थचा हा सल्ला प्रत्येकानेच आत्मसात करण्यासारखा आहे. अनेक कलाकार आणि त्याचे चाहते त्याच्या या पोस्टचं कौतुक करत आहेत.