तूफान

तूफान
- Advertisement -



अभिषेक खुळे

चित्रपट असो वा वेबसीरीज, नाटक असो वा एखादी कथा… प्रत्येकाची एक ‘वन लाइन’ ठरलेली असते. ‘तुफान’च्या बाबतीत बोलायचं, तर इथं ती फसली आहे. या चित्रपटाला स्पोर्ट ड्रामा म्हणायचं की लव्हस्टोरी, हा प्रश्न पडतो. दिग्दर्शकाला नेमकं सांगायचं काय, असा प्रश्न पडत राहतो. ना धड हे ना धड ते, अशी स्थिती होते. चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. इथं मात्र कलाकारांनी ही कलाकृती आपल्या खांद्यावर पेलली आहे, म्हणून बरं… असंही वाटत राहतं.

राकेश ओमप्रकाश मेहरा हे उत्तम दिग्दर्शक यात शंकाच नाही! मात्र, इथं जरा गल्लत झाली. ‘तुफान’चे प्रोमो आले तेव्हा हा स्पोर्ट ड्रामा आहे, असंच वाटलं. त्यादृष्टीनं प्रत्येकानं आपली मानसिकता तयार करून ठेवली होती. प्रत्यक्षात भ्रमनिरास होतो. चित्रपटाची कथा एकदम दमदार आहे. ती सरळ रेषेत न नेता त्यात उगाच इतर गोष्टींची सरमिसळ केल्यानं गोंधळ झाला आहे. मेहरा यांच्या ‘भाग मिल्खा भाग’मध्येही उपकथानकं होती; मात्र त्यांनी मूळ विषयावर अतिक्रमण केलं नाही. त्यामुळे ती एक सरस कलाकृती ठरली. खेळांवर बेतलेले इतर चित्रपटही तसेच. ‘तुफान’चे टाके मात्र जागोजागी उसवले आहेत.

मुंबईच्या डोंगरीतला अनाथ अज्जूभाई () आपल्या परिसरात गुंडगिरी करण्यात पटाईत. त्याच्या ताकदीचा त्यानं सदुपयोग करावा, असं त्याला नुकतीच भेटलेली अनन्या () सांगते. बॉक्सिंगकडे आकर्षित झालेला अज्जू त्याकडे लक्ष द्यायला लागतो. या खेळात ‘इज्जत’ मिळेल, असं अनन्यानं त्याच्या मनावर बिंबवलेलं असतं. मग बॉक्सिंगचे गुरू नाना प्रभू () यांच्याकडे तो प्रशिक्षणासाठी जातो. काही स्पर्धांमध्ये अज्जू मस्त कामगिरी करतो. तो बॉक्सिंगचं पुढचं भवितव्य अशी भाकितं करून त्याला ‘तुफान’ नाव दिलं जातं. प्रभू हे अनन्याचे वडील. तोवर अनन्या अन् अज्जूचं प्रेम बहरलेलं असतं. अज्जूनं बॉक्सिंग क्षेत्रातच चँपियन व्हावं, हे अनन्याचं स्वप्न आहे. प्रभू कट्टर हिंदुत्ववादी, मग अज्जू अन् अनन्याच्या प्रेमकहाणीत अडचणी आल्याच. चित्रपट धिम्या गतीनं पुढं सरकतो. उपकथानकं असावीत आणि त्याला काही धरबंदही असला पाहिजे. काही कारणांनी बॉक्सिंग फेडरेशन अज्जूला पाच वर्षं दूर ठेवतं. त्यादरम्यान, वडिलांचा विरोध पत्करून अनन्या ही अज्जूशी विवाहबद्ध होते. अज्जूही चांगला माणूस होत नोकरी करू लागतो. पाच वर्षांनंतर फेडरेशन त्याच्यावरील बॅन हटवते. आता बॉक्सिंग आपल्यासाठी नाही. आपलं वय, शरीर वाढलंय वगैरे कारणं सांगत अज्जू दुर्लक्ष करतो. अनन्या त्याला उद्युक्त करते वगैरे ही कथा. त्यात चढउतार आहेत; मात्र मूळ गाभा कुठेतरी हरवला अन् शेवटच्या काहीच मिनिटांत थरार दाखवून दिग्दर्शक मोकळा होतो, तोवर प्रेक्षकांच्या उत्कंठेचा पार बोऱ्या वाजलेला असतो. बाकी गोष्टींत वेळ घालवण्यापेक्षा रोमांच अधिक फुलवला असता; तर स्पोर्ट ड्रामाप्रेमी दिग्दर्शकाचे शुक्रगुजार असते. आपली प्रेयसी अनन्या प्रभू आहे आणि कोच नाना प्रभू. तरी इतके दिवस ते दोघे बाप-लेक आहेत, हे अज्जूला कळू नये?

आधीच सांगितल्याप्रमाणे यातल्या कलाकारांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मृणाल ठाकूरच्या आतापर्यंतच्या करिअरमधली ही उत्तम भूमिका म्हणावी लागेल. फरहानची मेहनत वाखाणण्याजोगी. परेश रावल नेहमीप्रमाणेच भूमिकेत पूर्ण उतरलेले. , सुप्रिया पाठक, हुसेन दलाल, विजय राज, देवेन खोटे, दर्शनकुमार, अरहान चौधरी या सर्वांच्याच भूमिका सरस. सोनाली कुलकर्णीची छोटीशी भूमिकाही प्रभावी. अनन्या अन् अज्जूच्या मुलीच्या भूमिकेतील छोटीशी गौरी फुलका लाजवाब. संगीतही बऱ्यापैकी ठसठशीत. कथा अन् कलाकारांचा अभिनय उत्तम. हा चित्रपट ‘चांगला’ या वर्गवारीत मोडणारा. सादरीकरण फसलंय. एकंदरीत, ‘ये तुफान हैं या हवा का झोंका,’ हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. निवड शेवटी तुमची आहे.

तुफान

लेखक ः अंजुम राजाबली, विजय मौर्य, फरहान अख्तर

निर्माता-दिग्दर्शक ः राकेश ओमप्रकाश मेहरा

संगीत ः शंकर-एहसान-लॉय, डब शर्मा, सॅम्युएल-आकांक्षा, डॅनियल लॉन्झिस्की

गीते ः जावेद अख्तर, डे’व्हिल, मनोजकुमार नाथ

छायांकन ः जय ओझा

संकलन ः मेघना मनचंदा सेन

कलावंत ः फरहान अख्तर, मृणाल ठाकूर, परेश रावल, डॉ. मोहन आगाशे, सुप्रिया पाठक, हुसेन दलाल, विजय राज, देवेन खोटे, दर्शनकुमार आदी.

ओटीटी ः अॅमेझॉन प्राइम

दर्जा ः तीन स्टार



Source link

- Advertisement -