संगमनेर :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पहिले महाअधिवेशन आज मुंबईतील गोरेगाव येथे होत आहे. राज्यभरातून हजारो मनसैनिक या अधिवेशनासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले आहे. हा झेंडा संपूर्ण भगवा आहे. झेंड्याच्या मध्यभागी शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. यामुळे आता हा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नव्या झेंड्याविरोधात संभाजी बिग्रेडने पुण्यात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उत्कृष्ट नेते आहेत. पण त्यांनी त्यांच्या पक्षाचा झेंडा बदलून चालणार नाही. त्याचा कोणताही फायदा होणार नाही. त्यांनी खऱ्या अर्थाने मन बदलले पाहिजे. त्यांच्या सभेंना मोठी गर्दी होत असते. पण त्याचे रुपांतर मतांमध्ये होत नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने मनसेसोबत युती करु नये असे परखड मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. संगमनेर मध्ये ते पत्रकाराशी बोलत होते.
मोदी सरकार हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना कशा पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी आम्ही काम करत आहे. यापुर्वी भाजप शिवसेनेची युती असतांना त्यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सातत्याने म्हणत होते की, सर्वसामान्य शेतकºयांना एक दोन लाखांची कर्जमाफी नको, तर त्यांचा सातबारा हा कोरा झाला पाहिजे. अशी भूमिका त्यांची त्यावेळी होती. आता तर ते स्वत: मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे दोन लाखांपर्यंत केलेली कर्जमाफी आम्हाला अजिबात मान्य नाही. सातबारा कोरा करावा अशी मागणी त्यानी केली. भीमा कोरेगाव प्रकरणाची फेरचोकशी करायला काही हरकत नसल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रा मधील शेतकऱ्यांना मदत मिळावी या करता केंद्राकडे मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली