हायलाइट्स:
- अभिनेता निर्भय वाधवा आर्थिक अडचणीत
- लॉकडाऊनमुळे दीड वर्षे हातात काम नव्हते
- दैनंदिन गरजा भागवण्यासाठी निर्भयला विकावी लागली त्याची आवडती गोष्ट
या आर्थिक अडचणींमुळे दैनंदिन गरजा भागवण्यासाठी देखील त्याच्याकडे पैसे नव्हते. हे खर्च भागवण्यासाठी निर्भयवर त्याची आवडती बाईक विकण्याची वेळ आली. आर्थिक अडचणींना सामोऱ्या जाणाऱ्या निर्भयने एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने सांगितले की, ‘गेली दीड वर्ष झाले मी घरी बसून आहे. त्यामुळे परिस्थिती दिवसागणिक अधिकाधिक खालवत गेली. लॉकडाउनमुळे जे काही माझे सेविंग होते ते संपले. हातात काही काम नव्हते. आधी केलेल्या कामाचे पैसे येणे बाकी होते परंतु तेही मिळाले नाही.’
निर्भयने पुढे सांगितले की, ‘मला साहसी प्रकारांची आवड आहे. त्यामुळे मी मोठ्या हौसेने पैसे साठवून सुपर बाईक विकत घेतली होती. ही गाडी जयपूरमधील माझ्या घरी होती. या लॉकडाउनमध्ये आर्थिक समस्या निर्माण झाल्याने नाईलाजाने मला बाईक विकावी लागली. बाईक विकण्याचा निर्णय मोठ्या दुःखी मनाने घेतला. मी ही गाडी २२ लाखांना विकत घेतली होती. त्यामुळे ती तेवढ्या किमतीमध्ये विकत घेणारे कुणी मिळत नव्हते. मग नाईलाजाने मला ती बाईक त्याच कंपनीला साडे नऊ लाखांना विकावी लागली. या बाईकसोबत माझ्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या होत्या.’
दरम्यान, निर्भयला आता काम मिळाले आहे. लवकरच तो ‘विघ्नहर्ता गणेश’ या मालिकेत हनुमानाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही मालिका सोनी टीव्हीवरून प्रसारित होणार असल्याचेही त्याने सांगितले. निर्भयने स्टार प्लसवरून प्रसारित होणाऱ्या ‘महाभारत’ मालिकेमध्ये दुःशासनाची भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे त्याने कयामत की रात या मालिकेत कालासूर ही भूमिका साकारली होती.