Home शहरे अकोला त्र्यंबकेश्वर देवस्थान विकासासाठी लवकरच बैठक घेऊ – विधानसभा उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे

त्र्यंबकेश्वर देवस्थान विकासासाठी लवकरच बैठक घेऊ – विधानसभा उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0
त्र्यंबकेश्वर देवस्थान विकासासाठी लवकरच बैठक घेऊ – विधानसभा उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नाशिक दि. 15 एप्रिल 2022 (जिमाका वृत्तसेवा): त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या अनेक परवानग्या तांत्रिकबाबीमुळे केंद्रीय पुरातत्व विभागाकडे प्रलंबित आहे. तसेच देवस्थानचे प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी पुरातत्व, नगररचना आणि पर्यावरण विभाग सोबत लवकर संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे  विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे सांगितले.

त्र्यंबकेश्वर येथील देवस्थानचे विश्वस्त व अधिकारी यांच्याशी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विकासकामांचा आढावा घेऊन चर्चा केली त्यावेळी त्या बोलत होत्या.  यावेळी  इगतपुरी प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, मुख्याधिकारी संजय जाधव, नायब तहसीलदार सतीश निकम,  त्र्यंबकेश्वरचे त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त संतोष कदम, भूषण अडसर, सत्यप्रिय शुल्क, प्रशांत गायधनी, तृप्ती धारणे उपस्थित होते.

विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्या दरम्यान उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे  यांनी आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराची विधीवत पुजा केली. तसेच यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराला फेरी मारून प्रदक्षिणा पूर्ण केली. डॉ.नीलम गोऱ्हे यांनी यावेळी देवस्थान ट्रस्टला 11 हजार एक रुपयांची देणगी दिली.

डॉ. नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे अंतर्गत दुरुस्त्या, विकास कामे  केंद्रीय पुरातत्व विभागाच्या परवानगी न मिळाल्याने प्रलंबित आहे. जवळपास अशी एकूण 35 कामे आहेत. केंद्रीय पुरातत्व विभाग व राज्य पुरातत्व विभाग यांच्यासोबत तांत्रिक मुद्यांवर चर्चा करून पंढरपूरच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर देवस्थानची कामेही मार्गी लावले जातील यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल,अशी ग्वाही डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

प्रस्तावित विकासकामे मार्गी लावण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाला पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाची प्रत कार्यालयाकडे सादर करावी, तीर्थराज कुशावर्तचे पाणी सतत शुद्ध राहायला हवे. त्यासाठी येथील जलशुद्धीकरण केंद्राचा प्रस्ताव पाठविण्यात यावा. त्यावर नगर विकास विभाग आणि पर्यावरण विभागाशी  समन्वय साधू, असे त्यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन करावे, जेणेकरून येणारे भाविक मोठ्या श्रद्धेने फळ फुलं अर्पण करतात त्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन देवस्थानने केले तर भाविकांच्या भावना जपल्या जातील आणि त्या घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करता येईल. तसेच सौर उर्जा प्रकल्पाचा हे स्वतंत्र प्रस्ताव द्यावा अशा सूचना त्यांनी प्रशासन आणि देवस्थान विश्वस्त मंडळास दिल्या.

 

000