Home ताज्या बातम्या दक्षिण मुंबईत मोठ्या घरांना सर्वाधिक मागणी

दक्षिण मुंबईत मोठ्या घरांना सर्वाधिक मागणी

0
दक्षिण मुंबईत मोठ्या घरांना सर्वाधिक मागणी

म. टा. प्रतिनिधी

मुंबई : मागील काही वर्षांत मुंबईचे रिअल इस्टेट क्षेत्र प्रचंड विस्तारले आहे. याअंतर्गत दक्षिण मुंबई भागात मोठ्या घरांनाच सर्वाधिक मागणी असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. ‘सीआरई मॅट्रिक्स’ या संस्थेने ‘क्रेडाई-एमसीएचआय’च्या सहाय्याने हे सर्वेक्षण केले.

या सर्वेक्षणामध्ये मुंबई शहर, उपनगरासह संपूर्ण मुंबई महानगरातील मागील सहा वर्षांच्या घरखरेदी-विक्रीचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार दक्षिण मुंबईतील एकूण खरेदीत ४७ टक्के घरे ६३० ते ११५० चौरस फुटांची होती. त्यामध्ये प्रामुख्याने ३ किंवा ३.५ बीएचके फ्लॅट्सचा समावेश आहे. हे प्रमाण मध्य मुंबई उपनगरात ३८५ ते ७५० चौरस फूट इतके आहे. या आकारमानातील ५४ टक्के घरांची खरेदी मुंबईकरांनी मागील सहा वर्षांत मध्य उपनगरात केली. पूर्व उपनगरांचा विचार केल्यास तेथे हे प्रमाण ४८० ते ८३० चौरस फूट इतके आहे. या आकारमानातील तब्बल ६६ टक्के घरांची खरेदी मागील सहा वर्षांत झाली. पश्चिम उपनगरात हे आकारमान ४२० ते ८८० चौरस फूट इतके आहे. एकूण घर खरेदीपैकी या आकारमानातील ६३ टक्के घरांची खरेदी मागील सहा वर्षांत पश्चिम उपनगरांत झाली.

या सर्वेक्षणात कल्याण-डोंबविली ते अंबरनाथ, बदलापूर, ठाणे महापालिका, मिरा-भाईंदर महापालिका, वसई-विरार महापालिका, नवी मुंबई महापालिका व पनवेल महापालिका यांचाही समावेश आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ३०० ते ६३० चौरस फुटाच्या ७४ टक्के घरांची खरेदी झाली. ठाणे महापालिका क्षेत्रात २९० ते ६६० चौरस फुटाच्या ७३ टक्के, मिरा-भाईंदर महापालिकेत ३५० ते ६०० चौरस फुटाच्या ५७ टक्के, नवी मुंबईत ३४० ते ६४० चौरस फुटाच्या ७४ टक्के, वसई-विरारमध्ये २४० ते ५५० चौरस फुटांच्या तब्बल ८९ टक्के तर पनवेल महापालिका क्षेत्रात २३० ते ६३० चौरस फुटाच्या ८३ टक्के घरांची खरेदी झाली.

Source link