: चेंबुर, विक्रोळी व भांडुप या ठिकाणी दरड कोसळून ३२ नागरिकांचा बळी गेला. या विषयी कोणतेही कामकाज न करता सभा तहकुबीचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीत भाजपने मांडला. त्यावर शिवसेनेने थेट श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडून सभा तहकूब केली. दुःखद घटनेतही एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याची संधी दोन्ही पक्षांनी सोडली नाही.
दरडींच्या दुर्घटना अत्यंत दु:खद, वेदनादायी व क्लेशकारक असून पालिका प्रशासनाला भूषणावह नाही, असे स्पष्ट करत भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी गुरुवारी स्थायी समितीत कोणतेही कामकाज न करता सभा तहकुब करण्यात यावी, असा प्रस्ताव मांडला. त्यावर स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर कोणतीही चर्चा न करता श्रद्धांजली वाहून सभा तहकूब केली. सभागृहाच्या कामकाजाच्या प्रथा-परंपरेनुसार श्रद्धांजलीचा प्रस्ताव सभागृह नेत्यांनी मांडायचा असतो. त्याऐवजी थेट अध्यक्षांनी स्वतः प्रस्ताव मांडल्याने भाजपने त्यास हरकत घेतली. दरड कोसळण्याचे प्रकार वारंवार घडून जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी नगरसेवकांचे मत, विचार व सूचना आणि प्रशासनाची भूमिका यावर साधकबाधक चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र ढिम्म प्रशासन आणि असंवेदनशील सत्ताधारी शिवसेनेने चर्चेपासून पळ काढला, असा आरोप भाजपने केला आहे.
‘संरक्षक भिंतींचे सर्वेक्षण व्हावे ‘
‘प्रशासन जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करते, त्या धर्तीवर दाट लोकवस्ती असलेल्या डोंगराळ भागातील संरक्षक भिंतींचे तातडीने सर्वेक्षण करून तेथील असुरक्षित व धोकादायक भागातील लोकांचे स्थलांतर करणे आवश्यक आहे. त्यामुळे जीवित व वित्तहानी टाळता येईल. सर्व ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यासाठी संबंधित प्राधिकरणांकडून तातडीने आवश्यक निधीची उपलब्धता करून घ्यायला हवी’, असे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.