दर्जेदार शिक्षण आणि पौष्टिक आहारामुळे शिक्षित, सुदृढ युवा पिढी घडेल – विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर

दर्जेदार शिक्षण आणि पौष्टिक आहारामुळे शिक्षित, सुदृढ युवा पिढी घडेल – विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर
- Advertisement -

मुंबई दि. ४ : विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यात शासनासमवेत खाजगी संस्थांनीही सहकार्य करावे.  यामुळे शिक्षित समाज, सुदृढ युवा पिढी घडण्यास मदत होणार असल्याचे मत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मांडले.

विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांच्या पुढाकाराने आणि हरे कृष्ण मुव्हमेंट फाऊंडेशन, अवेक ॲण्ड अराईझ या संस्थांच्या सहाय्याने अक्षय चैतन्य योजनेच्या माध्यमातून कुलाबा क्षेत्रातील महानगरपालिका शाळेतील ९ वी व १० वीतील विद्यार्थ्यांना मोफत मध्यान्ह भोजन उपक्रमाच्या शुभारंभ आज कुलाबा महापालिका माध्यमिक शाळेत अध्यक्ष ॲड.नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

ॲड. नार्वेकर म्हणाले, मिड-डे मिलच्या माध्यमातून १ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात येते. मात्र, हरे कृष्ण मुव्हमेंट फाऊंडेशन आणि अवेक ॲण्ड अराईड अशा खासगी संस्थांच्या मदतीने कुलाबा क्षेत्रासह मुंबईतील ७५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पौष्टिक भोजन देण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेचा प्रत्येक विद्यार्थ्याला लाभ मिळणार आहे.

विद्यार्थी  देशाचे भविष्य असून त्यांनी देशाला अभिमान वाटेल, असे कर्तुत्व सिद्ध करावे.  जागरूक नागरिक बनून समाजातील सर्व घटकांना सहकार्य करण्याची भावना विद्यार्थ्यांनी बाळगावी, असे आवाहनही ॲड. नार्वेकर यांनी केले. यावेळी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ॲड. नार्वेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी हरे कृष्ण मुव्हमेंट फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरमंडल दास, उपेंद्र नारायण दास, अक्षय चैतन्य योजना राबविणारे विजय कृष्ण  दास, अवेक ॲण्ड अराईसचे संस्थापक रमा सिंग दूर्गवंशी, शाळेचे मुख्याध्यापक शंकर पवार, उपमुख्याध्यापक चंद्रमुखी निकाळे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

- Advertisement -