‘दवाखाना आपल्या दारी’चा लाखो रुग्णांना लाभ – महासंवाद

‘दवाखाना आपल्या दारी’चा लाखो रुग्णांना लाभ – महासंवाद
- Advertisement -

नागपूर, दि.13:दुर्गम भागातही आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘दवाखाना आपल्या दारी’ या उपक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गेल्या जवळपास दोन वर्षात हजारो रुग्णांना त्यांच्या दारात येणाऱ्या या दवाखान्याचा लाभ होत आहे. राज्यातील कोणीही व्यक्ती उपराचाराशिवाय राहू नये. प्रत्येकाला चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाल्या पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धोरण आहे. त्याला अनुसरून नागपूर जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा खनीज प्रतिष्ठान यांनी २०२३ मध्ये सुरू केलेला हा उपक्रम दुर्गम भागातील नागरिकांसाठी वरदान ठरला आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम सुरू करणारा नागपूर हा राज्यातील पहिलाच जिल्हा आहे.

या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा प्रारंभ डिसेंबर २०२३ मध्ये झाला होता. ११ डिसेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘दवाखाना आपल्या दारी’ची सुरुवात झाली होती. पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नसल्याने ज्यांच्या आरोग्याची हेळसांड होत होती, अशा नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात २६ मोबाइल वैद्यकीय वाहनांद्वारे मोफत प्राथमिक उपचार, तपासणी आणि औषधे पुरविण्याचे काम  ‘दवाखाना आपल्या दारी’ द्वारे करण्यात येत आहे. यामुळे गरीब व ज्येष्ठ नागरिकांना तातडीची आरोग्य सेवा मिळू लागली. फिरत्या व्हॅनद्वारे तपासणी, निदान, मोफत औषधोपचार आणि महत्त्वाच्या आरोग्य योजनांचा लाभ या उपक्रमांमुळे सामान्य लोकांना घेता येत आहे.

११ डिसेंबबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२६ २०२५ या कालावधीत तब्बल १४ लाख २९ हजार ९८३ रुग्णांची तपासणी ‘दवाखाना आपल्या दारी’तून झाली आहे. यात २६८५ मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच तपासणीत आढळलेल्या १८५ क्षय व १२० कुष्ठरोग रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. ११२ रुग्णांना मुख कर्करोग झाल्याचे आढळून आले. त्यातील ५९ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. अशीच शस्त्रक्रिया स्तन कर्करोगच्या २४ रुग्णांवर करण्यात आली. प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रम, असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, स्तन कर्करोग, राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम, सिकलसेल नियंत्रण, राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम, राष्ट्रीय क्षयरोग निमूर्लन, राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंधन व नियंत्रण, राष्ट्रीय कुटुंब नियोजन कायर्क्रम या उपक्रमांद्वरे राबविण्यात येत आहेत.

 या उपक्रमा अंतर्गत डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२६ या कावाधीत जिल्ह्यात १२,७४७ आरोग्य शिबिरे घेण्यात आली. यात काटोल (१०८२), कामठी (१०६८), रामटेक (१०६१), हिंगणा (१०२०), पारशिवनी (१०१९), नरखेड (१००५), भिवापूर (१००३), सावनेर (९७६), मौदा (९६१), नागपूर ग्रामीण (९५३), कुही (९४७), कळमेश्वर (८८२) यांचा समावेश आहे.

नागपूर जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नसलेले ग्रामीण भाग येथे हा उपक्रम राबवविण्यात येत असून, दवाखानाच दारात आल्याने संबंधित  नागरिकांना रुग्णालयात जाण्याची गरज नाही. त्यांच्या वेळेची व पैशाची बचत तर होतेच शिवाय वेळेवर उपचारांमुळे गंभीर आजार टाळले जातात, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत यांनी सांगितले

.

                                                               0000

- Advertisement -