Home शहरे नागपूर दारुड्या मुलाची वृद्ध पित्याने केली हत्या

दारुड्या मुलाची वृद्ध पित्याने केली हत्या

नागपूर : जगणे मुश्किल करणाऱ्या दारुड्या मुलाची एका वृद्ध पित्याने हत्या केली. बेसा मार्गावरील अलंकारनगरात बुधवारी मध्यरात्री हा थरार घडला. मुलाच्या हत्येचे पातक घडल्यामुळे पश्चात्ताप झालेल्या पित्याने स्वत:च पोलीस ठाण्यात जाऊन अटक करवून घेतली. दामोदर नागोराव बाळापुरे (वय ७१) असे आरोपी पित्याचे नाव आहे.
संजय दामोदर बाळापुरे (वय ४०) असे मृताचे नाव आहे. तो अट्टल दारुड्या होता. त्याने दारूच्या नशेत क्षुल्लक कारणावरून सासºयाची हत्या केली होती. तीन महिन्यांपूर्वी तो कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. तेव्हापासून त्याने वृद्ध आईवडिलांचे जगणे मुश्किल केले होते.
वृद्ध दामोदर बाळापुरे सुतार काम करतात. त्यातून ते आपला उदरनिर्वाह करायचे. खाण्याघेण्यासोबतच वृद्ध पत्नीचे आजारपण आणि स्वत:ची प्रकृती असा सगळा भार त्यांच्या एकट्याच्या तुटपुंज्या मिळकतीवर अवलंबून होता. त्यात कारागृहातून बाहेर आल्यानंतर दारुडा संजय त्यांच्यावर ओझे बनला होता. तो वडिलांच्या भरवशावर खायचा आणि दारूचेही व्यसन पूर्ण करायचा. पैसे दिले नाही तर वृद्ध आईवडिलांना मारहाण करायचा. गेल्या काही दिवसांपासून तो वृद्ध आईला तिच्या भावाकडून (आपल्या मामांकडून) २५ हजार रुपये आणून दे म्हणून त्रास देत होता. तू पैसे मागून आणले नाही तर तुम्हा दोघांचीही हत्या करेन, अशी धमकी देत होता. बुधवारी मध्यरात्री त्याने दारूच्या नशेत टून्न होऊन आईवडिलांकडे २५ हजार रुपयांची मागणी केली. आईने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता संजय तिच्या अंगावर धावून गेला. ते पाहून वृद्ध दामोदर बाळापुरे यांनी संजयला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याही अंगावर तो धावून आला. सुतारकाम करण्यासाठी वापरण्यात येणारा वासला घेऊन त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. वडिलांना बाजूच्या विहिरीजवळ ढकलत नेले. धोका लक्षात आल्यामुळे दामोदर यांनी संजयच्या हातातील वासला हिसकावून घेत त्याच्या डोक्यावर घाव घातला. दारूच्या नशेत तर्र असल्याने एकाच घावात संजय ठार झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. संजय ठार झाल्याचे लक्षात आल्याने वृद्ध दामोदर यांनी थेट हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठले आणि हातून घडलेल्या गुन्ह्याची माहिती देत स्वत:ला अटक करवून घेतली.
वृद्धेची कोंडी
या हत्या प्रकरणामुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ती यामुळे की आरोपी दामोदर बाळापुरे यांच्या वृद्ध पत्नीची या हत्येमुळे चोहोबाजूने कोंडी झाली आहे. तिचा दारुडा का होईना मुलगा ठार झाला. तर त्याच्या हत्येच्या आरोपात त्यांचा जगण्याचा आधार असलेले पती दामोदर कारागृहात पोहचले. त्यामुळे आता कसे जगायचे, असा प्रश्न या वृद्धेपुढे आ वासून उभा आहे.