‘दिलखुलास’ कार्यक्रमात मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अविनाश आवलगावकर यांची विशेष मुलाखत – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ९ : मराठी भाषेचा समृद्ध वारसा जतन करण्यासह तिचे आधुनिक ज्ञानभाषेत रूपांतर, साहित्य-संस्कृतीचे संवर्धन आणि जागतिक स्तरावर मराठीचा प्रभाव वाढविण्याच्या दिशेने अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे स्थापन करण्यात आलेले देशातील पहिले स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या विद्यापीठाची स्थापना, शैक्षणिक वाटचाल, संशोधनकार्य आणि भविष्यातील विकासाच्या संकल्पनांचा वेध माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. यानिमित्त मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अविनाश आवलगावकर यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही विशेष मुलाखत दि. ११ ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ‘News On AIR’ या ॲपवरही श्रोत्यांना ही मुलाखत ऐकता येणार आहे. निवेदक आशिष गवांदे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

    मराठी भाषेच्या संवर्धनासाठी स्वतंत्र विद्यापीठाची संकल्पना कशी आकाराला आली, त्यामागील शासनाची भूमिका, विद्यापीठाचा आराखडा आणि मराठी भाषेच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या रिद्धपूर नगरीचे ऐतिहासिक व सांस्कृतिक योगदान अशा विविध पैलूंवर या मुलाखतीत प्रकाश टाकण्यात येणार आहे. तसेच मराठी भाषेचा प्राचीन साहित्यिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्राचीन हस्तलिखिते, दुर्मीळ ग्रंथ आणि ऐतिहासिक साहित्यसंपदेचे जतन, संवर्धन व डिजिटायझेशन करण्याच्या उपक्रमांबरोबरच संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठामार्फत करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहितीही या मुलाखतीतून मिळणार आहे. विद्यापीठातील विविध शैक्षणिक अभ्यासक्रम, पायाभूत सुविधांचा विकास, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शैक्षणिक संधी आणि मराठी भाषा व साहित्याच्या अभ्यासासाठी निर्माण होणारे नवे क्षितिज याविषयी कुलगुरू प्रा. डॉ. आवलगावकर आपले विचार मांडणार आहेत.

    मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध साहित्यपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा यांची ओळख करून देतानाच आधुनिक काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मराठी भाषेला सक्षम करण्याच्या विद्यापीठाच्या प्रयत्नांची माहिती देणारी ही मुलाखत विद्यार्थी, संशोधक, साहित्यप्रेमी आणि मराठी भाषेच्या जतन-संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या सर्वांसाठी निश्चितच ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरणार आहे.

     

    000

    - Advertisement -