मुंबई, दि. ११ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘घरोघरी तिरंगा’ या विषयावर मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२ केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून शुक्रवार दि.१२ ऑगस्ट रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल आहे. वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीत मुंबई शहर जिल्ह्यात देशाच्या स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा अभियानानिमित्त राबविण्यात येणारे उपक्रम, विद्यार्थ्यांमध्ये करण्यात येणारे जनजागृतीचे उपक्रम, पथनाट्य स्पर्धा, फोर्ट येथे मुंबई शहराचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभागावर आधारित लघुपट व चित्रप्रदर्शन, स्केटींग रॅली, तिरंगा रथ, विद्युत रोषणाई, सायकल रॅली यासह इतर नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या मतदार नोंदणी व इतर महत्त्वपूर्ण उपक्रमांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी श्री.निवतकर यांनी दिली आहे.
०००