हायलाइट्स:
- दिलीप कुमार यांना हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज
- तब्येतीमध्ये सुधारणा झाल्याने डॉक्टरांनी घेतला निर्णय
- त्यांच्या उत्तम तब्येतीसाठी प्रार्थना करा, सायरा बानो यांचे आवाहन
त्यांच्या उत्तम तब्येतीसाठी प्रार्थना करा, सायरा यांचे आवाहन
दिलीप कुमार यांना डिस्चार्ज देण्यात आला तेव्हा त्यांच्यासोबत पत्नी सायरा बानो देखील होत्या. हॉस्पिटल बाहेर असलेल्या प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सायरा यांनी खास आवाहन केले. त्या म्हणाल्या की, ‘तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा की यापुढेही सगळे ठीक असेल. आता त्यांच्या तब्येतीमध्ये बरीच सुधारणा झाली असून त्यांना घरी घेऊन जात आहे. डॉक्टरांनी त्यांना काही औषधं दिली आहेत. आता तुम्ही त्यांच्यासाठी चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना करा. देवाचेही आभार मानते.’
फुफ्फुसांतून काढले पाणी
दिलीप कुमार यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर चौथ्या दिवशी त्यांच्या फुफ्फुसांमधून पाणी काढण्यात आले. डॉक्टर जलील पारकर यांनी सांगितले की त्यांच्यावर योग्य ते उपचार केले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी १०० झाली आहे.
दिलीप कुमार आयसीयूमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर होते
दिलीप कुमार यांना रविवारी सकाळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची पत्नी सायरा बानो यादेखील त्यांच्यासोबत होत्या. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल केले होते. तब्येतीमध्ये सुधारणा झाल्यावर त्यांना जनरल वॉर्डमध्ये आणण्यात आले. दिलीप कुमार यांच्यावर पल्मोनोलॉजिस्ट डॉ. जलील पारकर आणि कार्डिओलजिस्ट डॉ. नितीन गोखले यांनी उपचार केले.