दिल्लीतील भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्राच्या वैभवशाली वारशाचे दर्शन घडणार – महासंवाद

    - Advertisement -

    • फोक आख्यानाचे २४ला आयोजन

     नवी दिल्ली, दि. १२ : देशाच्या राजधानीत आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यामध्ये ‘भागीदार राज्य म्हणून सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या भव्य दालनाचे उद्घाटन येत्या शनिवारी (14 नोव्हेंबर ) सायंकाळी 4 वाजता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. दिल्लीतील प्रगती मैदान येथे 14 ते 24 नोव्हेंबरदरम्यान आयोजित या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातून महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, औद्योगिक प्रगती, उद्यमशीलता आणि विकासाचा प्रवास देश-विदेशातील नागरिकांसमोर मांडण्यात येणार आहे.

    या उद्घाटन सोहळ्यास उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव डॉ.श्वेता सिंघल, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीप कवाडे, व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, उद्योग आयुक्त डॉ . कादंबरी बलकवडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

    महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या या दालनात एकूण 64 कक्षांचा समावेश आहे. एक जिल्हा एक उत्पादन (ओडिओपी) योजनेंतर्गत जिल्हानिहाय वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने, महिला बचत गट, महिला उद्योजिका, शासकीय महामंडळे तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या उत्पादनांना येथे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

    विकास आणि वारसा संकल्पनेतून महाराष्ट्राचे दर्शन

    ‘विकास आणि वारसा –  महाराष्ट्राचा समृद्ध वारसा, उद्यमशीलता आणि आधुनिक प्रगतीचा संगम’  ही या दालनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक वाडा वास्तुशैलीवर आधारित दालनाची रचना करण्यात आली असून, प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या कार्याचा गौरव करणारी शिल्परचना साकारण्यात आली आहे. पारंपरिक दीपमाळ, मावळे आणि तुळशी वृंदावन यांच्या प्रतिकृतींमधून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडणार आहे.

    दालनात कोल्हापुरी चप्पल, सोलापुरी चादरी, पैठणी, हस्तकला, वस्त्रोद्योग, लाकडी खेळणी, बंजारा कला, पारंपरिक धातूकाम, दागिने आणि भौगोलिक मानांकन (GI Tag) प्राप्त उत्पादनांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. याशिवाय विणकाम आणि सूत कताईचे थेट प्रात्यक्षिकही नागरिकांना पाहता येणार आहे.

    पायाभूत सुविधा आणि आधुनिक विकासाचे प्रदर्शन

    महाराष्ट्राच्या औद्योगिक व पायाभूत विकासाची माहिती देणारे विशेष विभाग दालनात उभारण्यात आले आहेत. ‘महाराष्ट्र कनेक्टिव्हिटी हब’ या विभागात अटल सेतू, महामार्ग, उन्नत मार्ग आणि आधुनिक वाहतूक सुविधांची माहिती देण्यात येणार आहे. ‘महाराष्ट्र मानबिंदू’ विभागातून भारतरत्न व पद्म पुरस्कारप्राप्त महाराष्ट्रातील मान्यवरांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञान, स्वयंचलित यंत्रणा, आधुनिक शेती आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील राज्याच्या प्रगतीचे चित्रणही करण्यात आले आहे.

    २४ नोव्हेंबरला फोक आख्यान

    महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारा ‘द फोक आख्यान’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम मंगळवार, दि. 24 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटर, प्रगति मैदान, नवी दिल्ली येथील ओपन ॲम्फीथिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. दिल्ली व परिसरातील नागरिकांनी तसेच कलाप्रेमींनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

     केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते उद्या व्यापार मेळ्याचे उद्घाटन

    इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (आयटीपीओ) आयोजित 45 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-2026 चे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते शुक्रवार, दि. 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे. ‘विकास  आणि विरासत’ ही संकल्पना असलेल्या या मेळ्यात 32 राज्ये व केंद्रशासित प्रदेश, 11 देश आणि 3500 हून अधिक प्रदर्शक सहभागी होणार आहेत. बिहार, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेश ही भागीदार राज्ये असतील. मेळ्यात 17 प्रदर्शन दालनांसह स्टार्टअप्स, पारंपरिक हस्तकला, स्थानिक उत्पादने, खाद्यसंस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन होणार आहे. तसेच सात ठिकाणी 87 सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, 14 ते 18 नोव्हेंबर हे दिवस व्यावसायिक अभ्यागतांसाठी, तर 19 ते 27 नोव्हेंबरदरम्यान मेळा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला राहणार आहे.

    0000000

    महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

    - Advertisement -