Home बातम्या राष्ट्रीय दिल्लीतील महिलांना उद्यापासून मोफत बसप्रवास, अरविंद केजरीवाल यांच्याकडून भाऊबीजेची भेट

दिल्लीतील महिलांना उद्यापासून मोफत बसप्रवास, अरविंद केजरीवाल यांच्याकडून भाऊबीजेची भेट

0

नवी दिल्ली: राजधानीतील महिलांना राज्य सरकारकडून भाऊबीजेला अपूर्व भेट मिळणार आहे. उद्या (२९ आॅक्टोबर) भाऊबीजेपासून महिलांना दिल्ली परिवहन विभागाच्या (डीटीसी) बसमधून मोफत प्रवास करता येईल. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या निर्णयाची अधिसूचना भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला अधिसूचना प्रसिद्ध केली. दिल्लीतील लाखो महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. मोफत प्रवासामुळे स्वाभाविकपणे महिला प्रवाशांची संख्या वाढणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेसाठी १३ हजार मार्शल उद्यापासून तैनात केले जातील. जूनमध्ये घोषणा केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी उद्या होईल. राज्य सरकारने तयारी पूर्ण केली आहे. प्रवासी महिलेस गुलाबी रंगाचे टोकन (तिकिट) दिले जाईल. मोफत प्रवास असताना तिकिट का, असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला होता. प्रवाशांचा निश्चित आकडा कळण्यासाठी तिकिट देत असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले.

मोफत प्रवास योजनेमुळे डीटीसीला १४० कोटी रूपयांचा तोटा होईल. तो भरून काढण्यासाठी राज्य सरकार १४० कोटी रूपयांचा अतिरिक्त निधी राज्य परिवहन विभागाला देणार आहे. महिला प्रवाशांना देण्यात येणाऱ्या एका गुलाबी रंगाच्या तिकिटाच्या बदल्यात प्रत्येकी दहा रूपये राज्य सरकारकडून डीटीसीला मिळतील.

राजकीय लाभ घेण्यासाठी आम आदमी पक्षही सज्ज झाला आहे. घरोघरी मोफत प्रवासाचा प्रचार केला जाईल. बससोबत मेट्रोतूनही महिलांना मोफत प्रवासीच भेट देण्याची सरकारची योजना होती. परंतु केंद्र सरकारच्या आडकाठीमुळे शक्य झाले नाही, असाही प्रचार पक्ष करणार आहे. विधानसभा निवडणुकीला अवघे तीन महिने शिल्लक असताना अरविंद केजरीवाल यांनी प्रचारातही आघाडी उघडली आहे. दिल्लीतील अनधिकृत वस्त्या, अस्वच्छता, महिला असुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था, प्रदूषण, सीलिंगसारखे नागरी प्रश्न भीषण होत असताना भारतीय जनता पक्षाने अद्याप कलम ३७० च्या मुद्याचाच वापर आम आदमी पक्षाविरोधात केला आहे. त्यामुळे आता डीटीसी बसमधून मोफत प्रवास योजनेवर भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.

वैशिष्ट्ये
भाऊबीजेपासून महिलांना मोफत प्रवास
गुलाबी तिकिट मिळणार
सकाळी व संध्याकाळी शिफ्टमध्ये बसमध्ये मार्शल असतील.
१२ हजार ५०० मार्शल बसमधून प्रवास करतील
सह हजार सिविल डिफेन्स स्वयंसेवक. स्वयंसेवकांना प्रसिक्षण
३ हजारांपेक्षा जास्त गृहरक्षक दलाचे जवान तैनात
राजकीय प्रचारासाठी आपची रणनिती