दिल्लीतील म-हाटी एम्पोरियममध्ये रविवारपासून गणेशमूर्ती विक्री; पुरणपोळीही उपलब्ध

- Advertisement -


नवी दिल्ली, दि. २७ : दिल्लीतील बाबा खडकसिंह मार्गावरील महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या म-हाटी एम्पोरियममध्ये रविवारपासून गणेशमूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला सुरुवात होणार आहे. गणेशभक्तांसाठी हे प्रदर्शन १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत खुले राहणार आहे. महाराष्ट्रातील मूर्तीकारांच्या कलेला प्रोत्साहन देतानाच त्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि दिल्लीतील गणेशभक्तांना गणेशोत्सवासाठी आवश्यक साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

महामंडळाच्या वतीने गेल्या ३० वर्षांपासून या गणेशमूर्ती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील ३० हून अधिक गणेश मंडळांमध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पेण येथील सपना जाधव आणि वीणा भट यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कारागिरांनी शाडूची माती आणि कागदाच्या लगद्यापासून साकारलेल्या ५०० हून अधिक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती. ६ इंचांपासून ३ फुटांपर्यंत विविध आकारांत उपलब्ध असलेल्या या आकर्षक मूर्तींची किंमत १,५०० रुपयांपासून २५ हजार रुपयांपर्यंत आहे.

गणेशमूर्तींसोबतच गणेशोत्सवासाठी आवश्यक पूजासाहित्य, सजावटीचे साहित्य, पैठणीची तोरणे, आसने आणि विविध पूजावस्तूही येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना उत्सवाची आवश्यक खरेदी एकाच ठिकाणी करता येणार आहे. या प्रदर्शनाचे आणखी एक आकर्षण म्हणजे गणेशभक्तांना येथे महाराष्ट्रीयन चवीच्या गरमागरम पुरणपोळीचा आस्वाद घेता येणार आहे. त्यामुळे गणेशमूर्ती खरेदीसोबतच महाराष्ट्राच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आनंदही दिल्लीकरांना घेता येणार आहे.

गणेशमूर्तींचे बुकिंग तसेच प्रदर्शनासंदर्भातील अधिक माहितीसाठी ०११-२३३६३८८८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच सपना जाधव (९९७०२७७५५७) आणि वीणा भट (८९९९१२०९४९) यांच्याशी संपर्क साधून मूर्तींचे बुकिंग करता येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली



Source link

- Advertisement -