दिवाळीच्या आनंदात बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत शासनाची पावले वनमंत्री गणेश नाईक यांचा शहापूर दौरा ठरला आश्वासक – महासंवाद

    - Advertisement -

    ठाणे,दि.८ (जिमाका):- निसर्गाच्या लहरीपणापुढे आणि दुष्काळी छायेखाली जेव्हा शेतकरी राजा हतबल होतो, तेव्हा त्याच्या पाठीशी केवळ मदतीचा हात नव्हे तर कुटुंबासारखी सोबत देणारी प्रशासकीय आणि शासकीय यंत्रणा जेव्हा थेट बांधावर येते, तेव्हा तो बळीराजासाठी एक नवा आशेचा किरण ठरतो. यंदाच्या दिवाळीच्या सणात, विशेषतः लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील करपटवाडी (ढाढरे) येथे जाऊन आदिवासी व शेतकरी बांधवांसोबत केलेली प्रत्यक्ष भेट आणि संवाद या संवेदनशीलतेची उत्तम प्रचिती देणारा ठरला आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्रिमंडळाला आवाहन केले होते की, त्यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपली दिवाळी शेतकऱ्याबरोबर त्याच्या घरी जाऊन साजरी करावी.या आवाहनाला प्रतिसाद देत वनमंत्री गणेश नाईक यांनी आज ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील करपटवाडी येथे ही प्रेमाची अन् आस्थेची भेट दिली. यावर्षी संकट कितीही मोठे असले, तरी शासन आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, हा विश्वास या दौऱ्यामुळे पुन्हा एकदा दृढ झाला आहे.


    या विशेष दौऱ्यात मंत्री गणेश नाईक यांनी केवळ भेट दिली नाही, तर प्रत्यक्ष शेतात उतरून भातशेती, उडीद, नागली आणि खुरासनी या पिकांची पाहणी केली. निसर्गाच्या अवकृपेमुळे पिकांचे झालेले नुकसान आणि शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी त्यांनी अत्यंत आत्मीयतेने व जवळून समजून घेतल्या. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात आपापल्या कुटुंबापासून दूर राहून थेट ग्रामीण भागात दाखल झालेल्या मंत्र्यांनी आणि प्रशासनाने शेतकऱ्यांचे दुःख आपलेसे केले. यावेळी ढाढरे ग्रामपंचायतीच्या वतीने वनमंत्र्यांचा अत्यंत उत्साहात स्वागत व सत्कार करण्यात आला, तसेच आदिवासी बांधवांना अन्नधान्याची किट व दिवाळी भेटीचे वाटप करून या सणाला एक वेगळा व मानवीय स्पर्श देण्यात आला.

    याप्रसंगी आयोजित संवाद सभेत बोलताना माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शेतकऱ्यांना विश्वास देत स्पष्ट केले की, शंभर टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील आणि शेतकरी बांधवांच्या सर्व मागण्या व समस्या राज्याचे मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवून योग्य तो न्याय मिळवून दिला जाईल.


    या दौऱ्यात वनमंत्र्यांसोबत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा, शहापूरचे वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री.दिपेश मल्होत्रा, गटविकास अधिकारी बी.एच.राठोड, तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव, किन्हवली चे सहाय्यक उपनिरीक्षक नितीन खैरनार, श्री.सुनील शिंदे, भास्कर जाधव, नगरपंचायत गटनेते विवेक नार्वेकर, राम जागरे, शरद उमवणे, तानाजी पानसरे, सुनील लकडे यांच्यासह शहापूर तालुक्यातील वन विभाग, महसूल विभाग आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी व स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावरून शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकत्र आल्याचे उत्तम दर्शन घडले. महाराष्ट्र शासनाने दुष्काळी पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी पीक नुकसानीची भरपाई, वेळेत उपलब्ध होणारे थेट अनुदान, आपत्कालीन निधी आणि विविध कृषिपूरक उपायोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. जिल्हा प्रशासनाची ही कर्तव्यपरायणता आणि तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचण्याची तयारी हे दाखवून देते की, आजचे शासन केवळ घोषणा करणारे नसून प्रत्यक्ष कृतीतून बळीराजाच्या वेदनांवर फुंकर घालणारे आहे.

    या संपूर्ण दौऱ्याने आणि शासनाच्या दिलासादायक भूमिकेने राज्यातील शेतकरी वर्गामध्ये एक नवी सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे. ‘माझा बळीराजा कधीही एकाकी नाही आणि शासन त्याच्या पाठीशी सदैव कटिबद्ध आहे’ हा आश्वासक संदेश या दिवाळीने दिला असून, हा घट्ट विश्वास भविष्यातील अधिक समृद्ध, सुरक्षित आणि बळकट शेतीची पायाभरणी करणारा ठरेल, यात शंका नाही.

    0000

    - Advertisement -