दिव्यांगांसाठी दया नव्हे, समान संधी निर्माण करणे समाजाची जबाबदारी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १७ : दिव्यांग व्यक्तींकडे अपंगत्वाच्या नव्हे तर त्यांच्यातील क्षमता, प्रतिभा आणि दृढनिश्चयाच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. त्यांच्याविषयी केवळ सहानुभूती व्यक्त न करता त्यांच्यासाठी समान संधी निर्माण करणे ही समाजाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

    लोकभवन सेवा संकल्प अभियानांतर्गत वर्मा फाउंडेशन आणि मैत्री पीस फाउंडेशन यांच्या वतीने वाय. बी. चव्हाण सभागृह येथे आयोजित व्हीलचेअर वितरण शिबीर आणि राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल वर्मा बोलत होते. यावेळी महामंडलेश्वर राजेश ओझा महाराज, मैत्री पीस फाउंडेशनचे अध्यक्ष सुरजित बरुआ, सचिव मिलन पारेख, वर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष वासुमुदुमुरी वर्मा, पी. एन. स्वामी महाराज, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, पद्मश्री पुरस्कार विजेत्या सोमा घोष, समाजसेवक नवीन चंद्र, राहुल पाटील यांच्यासह राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार विजेते, लाभार्थी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन राज्यपाल वर्मा म्हणाले की, सेवाभावी आणि जनकल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून लोकांना एकत्र येण्याची प्रेरणा देणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’ची आज सुरुवात होत आहे. दिव्यांगांना मोफत व्हीलचेअरचे वितरण हा सेवा संकल्पाचा आदर्श आहे. स्वतःला लोकसेवेसाठी समर्पित करणे, हाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्याचा सर्वांत उचित मार्ग आहे. सेवा ही केवळ एक कृती नसून ती एक वृत्ती, जबाबदारी आणि सामायिक मानवतेची अभिव्यक्ती आहे. महात्मा गांधी यांना प्रिय असलेल्या ‘वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड परायी जाणे रे’ या भजनाचा उल्लेख करून दुसऱ्यांचे दुःख आणि वेदना समजून घेणे हीदेखील सेवाच आहे. व्हीलचेअर हे केवळ हालचालीसाठीचे सहाय्यक साधन नाही; ते दिव्यांग व्यक्तींसाठी सन्मान, स्वातंत्र्य आणि संधीचे माध्यम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘विकलांग’ऐवजी ‘दिव्यांग’ हा शब्द वापरण्याचे आवाहन करून समाजाच्या मानसिकतेत बदल घडविण्याचा संदेश दिला. व्यक्तीमध्ये काय नाही, यापेक्षा तिच्यातील असाधारण गुण आणि क्षमतांकडे पाहिले पाहिजे.

    दिव्यांगांचे कल्याण केवळ मदतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांचे सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकास साधला पाहिजे. ‘सुगम्य भारत अभियान’सारख्या उपक्रमांतून सार्वजनिक पायाभूत सुविधा दिव्यांगांसाठी सुलभ करण्याचे प्रयत्न होत आहेत. सरकार धोरणे आणि पायाभूत सुविधा निर्माण करू शकते; मात्र समाजपरिवर्तनासाठी समाजातील प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

    वर्मा फाउंडेशन आणि मैत्री पीस फाउंडेशन यांनी दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण, सक्षमीकरण आणि सामाजिक समावेशनासाठी अधिक जोमाने काम करावे. स्वयंसेवी संस्थांनी गतिशीलता, सहाय्यक उपकरणे, शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार सहाय्याची गरज असलेल्या व्यक्तीं ओळखून त्यांना योग्य शासकीय योजना व संस्थांशी जोडावे. ‘सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया’ हा आपल्या संस्कृतीचा मूलमंत्र असून प्रत्येकाला आनंदी आणि दुःखमुक्त जीवन जगण्याची संधी मिळाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

    राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून राज्यपाल वर्मा म्हणाले की, प्रत्येक पुरस्कार विजेत्याच्या यशामागे कठोर परिश्रम, आव्हाने आणि दृढनिश्चयाची कथा असते. पुरस्कार विजेत्यांनी या सन्मानाकडे नवी जबाबदारी म्हणून पाहावे. समाजातील प्रत्येक घटक भारताच्या विकास प्रवासात समान भागीदार झाल्यास ‘विकसित भारत @२०४७’चे उद्दिष्ट साध्य होईल. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ११ दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअरचे वितरण करण्यात आले. तर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या ३२ व्यक्तींना राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कारही राज्यपाल वर्मा आणि मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

    000

    धोंडिराम अर्जुन/विसंअ

    - Advertisement -